हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता

By नितीन चौधरी | Published: December 19, 2023 03:04 PM2023-12-19T15:04:54+5:302023-12-19T15:05:58+5:30

तब्बल १६ वर्षांनी या स्मारकाच्या आराखड्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे

hutatma rajguru memorial will be completed in three years the state government approved the plan of 104 crores | हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता

हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता

पुणे : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरूनगर येथील वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा २००७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी या स्मारकाच्या आराखड्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव १०४ कोटी असून यात स्मारक तसेच परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मारकाचे काम वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यांच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविले, त्या पुणे जिल्ह्यातील शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरूनगर येथे हे स्मारक होणार आहे. राजगुरू यांच्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा २००७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये आराखडा तयार करून प्रत्यक्षात त्याला मान्यता मिळण्यास आठ वर्षांचा कालावधी लागला आहे. जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला. जिल्हास्तरीय समितीने २५४ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो मुख्य सचिवांच्या समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता. आराखड्यात प्रस्तावित कामे तीन टप्प्यांत ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

नुकत्याच झालेल्या बैठकीत या १०४ कोटी १२ लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर करावा, अशी सूचना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचा १३६ कोटी ४४ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

स्मारक उभारणीत काय होणार?

- स्मारकाचा जीर्णोद्धार, जन्मखोली, थोरला वाडा तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर इतर
- स्मारकातील सुविधा व विकास, सुविधागृह, वाचनालय, उपहारगृह
- नदी परिसर सुधारणा, राम घाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा
- संरक्षित भिंत व वाहनतळ
- पदपथ अंतर्गत रस्ते, लँडस्केप क्षेत्र
- खुले सभागृह, पुतळे, म्युरल्स
- संपूर्ण स्मारकाची प्रकाश व्यवस्था

स्मारकाच्या आराखड्याबाबत समितीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र त्याला निधी मिळत नसल्याने विधीमंडळात गेल्या वर्षी तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. आता राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिल्याने १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे पुढील दोन महिन्यात निविदा करून काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. - दिलीप मोहिते पाटील, आमदार ,खेड

Web Title: hutatma rajguru memorial will be completed in three years the state government approved the plan of 104 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.