हुतात्मा राजगुरू स्मारकाचे काम अनास्थेने रखडलेलेच, आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:18 AM2017-08-24T04:18:42+5:302017-08-24T04:18:46+5:30
देश स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचे रखडलेले काम कधी मार्गी लागणार, असा सवाल राजगुरुनगरवासीय करीत आहेत.
राजगुरुनगर : देश स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचे रखडलेले काम कधी मार्गी लागणार, असा सवाल राजगुरुनगरवासीय करीत आहेत. स्मारकाच्या पूर्णत्वासाठी लोक पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी चळवळ उभारणाºया भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी इंग्रजांनी फाशी दिली. पंजाबमध्ये हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंजाब सरकारकडून राज्यभर विविध कार्यक्रम होतात. मात्र, राजगुरूंच्या जन्मभूमीत - महाराष्ट्रामध्ये हा हुतात्मा अनेक वर्षे दुर्लक्षितच राहिला आहे. हुतात्मा राजगुरूचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुवाड्यांचे राजगुरूंच्या कर्तृत्वाला साजेशा हुतात्मा राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली जावी, अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. शासनाने राजगुरुवाडा हा ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. राजगुरुवाड्यातील थोरल्या वाड्याचे काम पूर्ण झाले आहे.
वाड्यात हुतात्मा राजगुरूंचे भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार होते. पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील एक महत्त्वाचे प्रेरणास्थळ व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल, अशा पद्धतीने या स्मारकाची उभारणी केली जाणार होती. खरंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. उलट क्रांतिकारकांच्यासंदर्भात शासकीय अनास्थेचाच प्रत्यय येत आहे.
वर्ष २००७ मध्ये राजगुरुनगर येथे राजगुरू यांच्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा करण्यात आली. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती व राजगुरुनगर नगर परिषद यांच्या वतीने दरवर्षी राजगुरुंच्या पुण्यतिथी, जंयतीनिमित्त कार्यक्रम तसेच १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी वाड्यावर ध्वजवंदन करण्यात येते.
तेव्हाच ही उपेक्षा थांबेल
क्रांतीकारकांच्या हुतात्मा दिनीच सर्वांना पुतळ्याची आणि स्मारकाची आठवण होते, मग पुन्हा विचारांचा जागर होतो.
आश्वासनांची खैरात होते आणि पुन्हा सगळे शांत! ही गेल्या कित्येक वर्षांची कैफियत आहे ती बदलायला हवी, तरच स्मारकाची आणि खºया अर्थाने राजगुरूंची उपेक्षा थांबेल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
हुतात्मा राजगुरु यांचा वाडा राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभाग यांच्या अखत्यारित येतो. स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधीची सोय करण्याची, तसेच स्मारकाच्या विकासकामाला गती देण्याची ८४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मंत्र्यांनी घोषणा झाली. आतापर्यंत सव्वादोन कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून स्मारकाचे काम केवळ ८ ते १० टक्केच पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा कागदी आराखडा सिद्ध झाला आहे. परंतु निधीअभावी सर्व कामे रखडली आहेत.
- सुशील मांजरे, सचिव,
हुतात्मा राजगुरु स्मारक समिती