हैदराबाद- मुंबई लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार
By admin | Published: January 21, 2017 08:38 AM2017-01-21T08:38:01+5:302017-01-21T13:55:18+5:30
हैदराबादहून मुंबईला येणा-या लक्झरी बसला इंदापूरजवळ भीषण अपघात झाला असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इंदापूर, दि. २१ - हैदराबादहून मुंबईला येणा-या लक्झरी बसला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
लक्झरी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात बसमधील चार जण जागीच ठार झाले.बारा जण जखमी झाले आहेत.त्या पैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्यापासून काही अंतरावर आज (दि.२१ )सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
श्रवण केंद्रे(वय २५ वर्षे,रा.डोंबिवली),विशाल गोकुळ लाड (वय ३२ वर्षे,रा.विजयंतनगर, देवळाई, सातारा),घंटा करणाकर (वय ३२ वर्षे,रा.हैदराबाद ),अमीरउल्ला बाबावल्ली खान (वय ३५ वर्षे,रा.फोर्ट व्हील काॅलनी, उप्परपल्ली, राजेंद्रनगर,जि.रेगारेड्डी) अशी मरण पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत. प्रितेश पटेल (वय ३६ वर्षे,रा.अहमदाबाद ), राजेश माणिक शितोळे(वय ४६ वर्षे,रा.वाघोली), निलेश सोमनाथ मिळशेटे (रा.पाली मरली,ता . कऱ्हाड,जि.सातारा),निलेश अशोक गोडबोले (रा.बदलापूर) हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.या संदर्भात संदीप सदाशिव धनवडे (वय ३० वर्षे,रा.न्यू पनवेल,सेक्टर ४ गुरुधाम सोसायटी,जि.रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.त्यावरुन उस्मान हाफीज सय्यद (वय ४५ वर्षे, रा.बसवकल्याण, जि.बिदर,कर्नाटक) या लक्झरी बस चालका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी सांगितले की,उस्मान हाफीज सय्यद हा बस चालक रात्री दहा वाजता आपल्या ताब्यातील लक्झरी बस (क्र.ए.पी. २३ वाय २२२२ ) मध्ये चाळीस प्रवाशांना घेवून हैदराबाद वरुन मुंबईला निघाला होता.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका ओलांडून पुढे येत असताना, भरधाव वेगातील बसवरचे त्याचेे नियंत्रण सुटले. दुभाजकावरुन बस रस्त्याच्या डाव्या बाजूला आली. पलटी होवून महामार्गाच्या कडेला असणारी पानटपरी उद्ध्वस्त करुन,एका हाॅटेलचे पार्किंग तोडून ती स्वच्छतागृहाच्या टाकीजवळ अडकली.फौजदार डी.एस.कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.