सरकारी रुग्णालयांत स्वच्छतेला प्राधान्य मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:13+5:302021-06-24T04:09:13+5:30
पुणे : एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकात ससून रुग्णालयाने रुग्णांची अहोरात्र सेवा केली आहे. गेल्या दीड वर्षात रुग्णालयप्रमुख आधारस्तंभ ...
पुणे : एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकात ससून रुग्णालयाने रुग्णांची अहोरात्र सेवा केली आहे. गेल्या दीड वर्षात रुग्णालयप्रमुख आधारस्तंभ बनले. महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संबंधित सर्व मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष घालू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. खासगी रुग्णालयांना लाजवेल अशी स्वच्छता ससून रुग्णालयात पाहायला मिळावी आणि लोकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या देशातील अग्रगण्य संस्थेला २३ जून रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. बैरामजी जीजीभॉय यांच्या देणगीतून १८७१ पासून सुरू असलेल्या मेडिकल स्कूलचे रुपांतर होऊन २३ जून १९४६ रोजी या महाविद्यालयाची सुरुवात झाली. ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबईचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, प्रशासकीय नियंत्रक एस. चोक्कलिंगम, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ''नागरिकांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, त्वरित दवाखान्यात दाखल झाल्यास डॉक्टरांना उपचार करणे सोपे होते. महामारीमध्ये आरोग्य सेवेचे महत्त्व प्राधान्याने अधोरेखित झाले आहे. त्यादृष्टीने सरकारने त्वरित पावले उचलली आहेत. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय उपकरणांची खरेदी करताना त्याचा दर्जा सर्वोत्तम असावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.''
अमित देशमुख म्हणाले, ''भारतातील दहा सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जेजे आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश व्हावा. बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा इतिहास गौरवशाली आहे. कोरोना काळात ससून रुग्णालयाने अमूल्य योगदान दिले आहे. सरकारनेही या काळात निधी कमी पडू दिला नाही. महाविद्यालय आणि रुग्णालयाबाबत असलेल्या सर्व अपेक्षा नक्की पूर्ण होतील.''
ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ''ससून रुग्णालयाने कोरोनाकाळात सुमारे ४२ हजार रुग्णांवर उपचार केले. साडेचार लाख कोविड चाचण्या येथे पार पडल्या. दर वर्षी रुग्णालयात ४० हजारहून अधिक शस्त्रक्रिया, तर १७ लाख प्रयोगशाळा तपासण्या केल्या जातात. कर्करोग रुग्णालय, दंतविद्यालयासाठी १०० एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. बी.जे. महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याबाबत अंदाजपत्रकीय भाषणात घोषणा करण्यात आली असून, पुढील काळात विस्तारीकरण आणि नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जातील.'' डॉ. रमेश भोसले प्रास्ताविक केले, तर डॉ. समीर जोशी आभार मानले.
-----
ससूनचे विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध आर्किटेक्चर क्रिस्तोफर बेनिंजर यांनी आधुनिकीकरणाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आणि नर्सिंग हॉस्टेल यासाठी स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा १०० वा वर्धापन दिन साजरा होईपर्यंत रुग्णालयाची क्षमता दुप्पट होणे गरजेचे आहे.
- एस. चोक्कलिंगम
------
जे.जे. आणि बी.जे. मेडिकलला स्वायत्तता मिळाल्यास वेगाने प्रगती साधता येईल. पुण्यात कर्करोग उपचारांसाठी रुग्णालय उभे राहणे आवश्यक आहे. ससूनमधील सुपरस्पेशालिटी सेवांचे बांधकाम पूर्ण झाले असून, तिथे कर्मचारी वर्ग नेमून काम सुरू करता येईल.
- डॉ. तात्याराव लहाने
------
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास चांगले मॉडेल तयार होऊ शकेल. आर्थिक स्थैर्य येऊन भविष्यात चांगली प्रगती साधता येईल. ग्रॅंट मिळाल्यास गुंतवणूकही वाढेल. डॉ. समीर जोशी यांनी याबाबतचे सादरीकरणही केले आहे.
- सौरभ विजय