"मैनेही मर्डर किया था साहब", असे म्हणत महिलेने पोलिसी खाक्या दाखवताच केला गुन्हा कबूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 11:41 AM2021-06-07T11:41:37+5:302021-06-07T11:42:04+5:30
सुरुवातीपासून पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला होता. त्यांनी अवघ्या चार दिवसात गुन्ह्याची उकल केली.
धायरी: मेरा पती घर से बाहर गया था... उसको किसने मारा, मुझे कूछ नही पता..असं म्हणणाऱ्या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच मैनेही मर्डर किया साहब.. असं म्हणत तिने आपल्या पतीचा खून केल्याचे कबूल केले. ग्यानदेवी प्रसाद ( मूळ राहणार: बिहार, सध्या: नऱ्हे, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बिहार मधील दोन अल्पवयीन मुलांचाही या हत्येत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
नऱ्हे येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले होते. कृष्णकुमार प्रसाद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णकुमार गेल्या एक वर्षापासून नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आपल्या पत्नीसमवेत राहत होता. तो उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करीत असल्याची माहिती मिळत आहे. रविवारपासून कृष्णकुमार बेपत्ता होता.
दरम्यान २ जूनला सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह शववि्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला. दरम्यान मंगळवारी शववि्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. याबाबत सुरुवातीला अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तांत्रिक माध्यमातून तपास करून महिलेला ताब्यात घेतले. सुरुवातीला मेरे पतिको मैने नही मारा..असं म्हणणारी ग्यानदेवीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच पतीचा खून केल्याचे कबूल केले.
ग्यानदेवी हिचे पाहिले एक लग्न झाले असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र कृष्णप्रसादची ओळख झाल्यानंतर तिने पहिल्या पतीला व मुलाला सोडून कृष्णप्रसाद बरोबर पुण्यात आली होती. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाबरोबर बोलू देत नव्हता. त्याचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध होते. त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले असता १० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चार दिवसात केली गुन्हाची उकल
कोणताही पुरावा नसताना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याची उकल केली. सुरुवातीपासून ग्यानदेवीवर पोलिसांचा संशय बळावला होता. मात्र ती मला काही माहीत नाही, माझा पती बाहेर गेला होता, असे म्हणत असल्याने गुन्ह्याची उकल होत नव्हती. मात्र पोलिसांनी तांत्रिक माध्यमातून तपास करून अखेर महिलेला ताब्यात घेतले.