मी पुणेकर, पण बंगाली! बंगाली-मराठीच्या सांस्कृतिक घुसळणीत जपल्या जाताहेत दोन संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:36 PM2022-10-05T12:36:29+5:302022-10-05T12:37:55+5:30
पुण्यातच जन्मलेल्या बकुळ वंदा चक्रवर्तीला बंगालातील दुर्गापूजा माहीतच नसल्याने ती शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनातील दुर्गापूजा उत्सवातच सहभागी होते....
नितीन चाैधरी
पुणे : दुर्गापूजा म्हटलं की बंगाली भाषकांचा जिव्हाळ्याचा विषय. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला बंगाली हा या काळात बंगालात अर्थात आपल्या घरी परततोच; पण पुण्यातच जन्मलेल्या बकुळ वंदा चक्रवर्तीला बंगालातील दुर्गापूजा माहीतच नसल्याने ती शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनातील दुर्गापूजा उत्सवातच सहभागी होते.
शमा भाटेंकडे कथक शिकणाऱ्या मराठीतच बोलणाऱ्या या बकुळ वंदाला बंगालपेक्षा पुण्याची ही दुर्गापूजाच अधिक आपुलकीची वाटते. दुर्गापूजेइतकाच गणेशोत्सव माझा प्रिय, असं सांगणारी बकुळ म्हणते, मी पुणेकर पण बंगाली. तीच कथा तिच्या वडलांचीही. पुण्यात बंगालीचं मिश्रण झालेलं हे कुटुंब सांस्कृतिक घुसळणीचं एक उत्तम उदाहरण आहे.
पुण्यात राहून केवळ मराठी बोलण्यापुरती ही सांस्कृतिक घुसळण महत्त्वाची नसून, पुण्यातील संस्कृती जोपासणं, बालगंधर्वला नाटकं बघणं, मराठी पुस्तकं वाचणं, सवाईला मांडी घालून हजेरी लावणं यातूनच मराठी-बंगालीचं मिश्रण होईल, असा ठाम विश्वास तिचे वडील अभिजित व्यक्त करतात. मी पुण्याऐवजी महाराष्ट्राच्या अन्य शहरांत नोकरी केली असती तर इथं स्थायिक होण्याचा विचारच केला नसता, अशा पक्क्या पुणेरी आविर्भावात आपण पुणेकर असल्याचं हे अख्खं कुटुंब ठामपणे सांगतं.
१९८० च्या दरम्यान सांगलीत इंजिनीअरिंग शिकायला आलेल्या या बंगाली तरुणाने मराठी बोलायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांनीही त्याला प्रोत्साहन दिलं. माछेर झोलऐवजी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्साच त्याला अधिक भावला. शिक्षण संपल्यावर कोलकात्याऐवजी पुण्याची वाट धरली. दोन-तीन वर्षांतच पुणं आपलं वाटू लागलं. मराठी अंगवळणी पडल्यावर त्यानं मराठी नाटकं पाहण्यासाठी बालगंधर्वला हजेरी लावायला सुरुवात केली. जवळच्या ग्रंथालयांतून मराठी पुस्तकं वाचू लागला. गाण्यांची आवड असल्यानं सवाईला मांडी लावून बसू लागला. याच दरम्यान मुंबईला ६ महिन्यांसाठी नोकरीही केली; पण पुण्याची सर नाही म्हणून पुन्हा पुण्यात परतला. अस्खलित बोलणारा हा अभिजित चक्रवर्ती येथेच स्थायिक झाला.
वारसा जपला पाहिजे
लग्नानंतर कोलकात्यातील वडिलांनाही पुण्यातच घेऊन आला. हाच अभिजित आता बांगाय संस्कृती संसदेचा पदाधिकारी म्हणून बंगाली संस्कृती जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. घरात आपल्या मुलींशी मराठीत जाणीवपूर्वक बोलणारे अभिजित यांना सांस्कृतिक वारसा जपायचा आहे. पुण्यात सुमारे अडीच ते तीन लाख बंगाली राहतात. मात्र, यातील २० टक्केच स्थायिक होताहेत. त्यामुळे दुर्गापूजेसारख्या उत्सवांमधून बंगाली संस्कृती जपण्यासोबत मराठीशीही नाळ जोडणं महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात. त्यामुळे पुढील उत्सवात लावणीचा कार्यक्रम ठेवून ही नाळ अधिक घट्ट करण्याचा त्यांचा मनोदय आहे. दुर्गापूजेच्या निमित्ताने हे बंगाली आपली संस्कृती जपताहेत. भविष्यात त्यात काय बदल होतील याची कल्पना नाही. मात्र, हा वारसा जपला पाहिजे, असं ते आवर्जून सांगतात.