"राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण राज्य सरकार अन् त्यांच्यातील वाद सोडवण्याइतका मोठा नेता नाही..!"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:57 PM2021-02-18T20:57:14+5:302021-02-18T21:04:32+5:30
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यातील नाते सर्वश्रुत आहे.
पुणे : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात नेहमी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरून खटके उडत असतात. त्यात नुकतेच कोश्यारी यांना सरकारी विमान प्रवासाला परवानगी नाकारत खाली उतरायला लागल्यामुळे हे नाते आणखीच चर्चेत आले आहे. पण त्याच दरम्यान महाविकास अगदी सरकारमधला आणि त्यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्याने राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच राज्यातील ताज्या घडामोडींवर रोखठोक भाष्य देखील केले. सामंत यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामधील संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी सातत्याने संवाद घडत असतो. आणि मी त्यांचा लाडका मंत्री आहे. पण राज्य सरकार आणि कोश्यारी यांच्यातील वाद सोडवण्याइतका मोठा नेता अजिबात नाही असे मत व्यक्त केले.
राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात तसा कोणताही वाद नाही. लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य सरकार लोकशाहीप्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देत असते.
संजय राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील...
पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेतली जात आहे. त्यामुळे आपल्याच सहकार्याबद्दल काहीतरी बोलणे योग्य ठरणार नाही. राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील असे सामंत यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालतो. त्यामुळे त्यांचा आदेश मान्यच करावाच लागतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेमध्ये कोणतेही गट तट नाहीत. जो आदेश देईल तो मान्य करावाच लागेल.