‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक व्हावी : पं. वसंत गाडगीळ; गुरूकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:54 PM2018-02-12T13:54:22+5:302018-02-12T13:58:58+5:30
धर्माचे उल्लेख टाळून ‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक करण्यासाठी यापुढे प्रयत्न करायला हवेत, असे मत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
पुणे : देशाचे आणि भाषेचे बंधन न बाळगता सगळा भारत एक हे मनात बिंबवायचं असेल तर मी मराठी, मी पंजाबी, मी गुजराती असे प्रादेशिक टाळून आणि मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन अशा प्रकारचे धर्माचे उल्लेख टाळून ‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक करण्यासाठी यापुढे प्रयत्न करायला हवेत, असे मत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी ‘राष्ट्रीय ऐक्याचे कार्य’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. गुरुकुल प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख श. अ. कात्रे, मराठी विज्ञान परिषदेचे म. ना. गोगटे, मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ. अविनाश चाफेकर आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते.
‘ज्ञानापलीकडे श्रेष्ठ काहीच नाही. ज्ञान हाच परमात्मा असून तोच आपला धर्म आहे’, असे सांगून गाडगीळ म्हणाले, ‘वेदांत, उपनिषदात, भगवद्गीतेत, पुराणात कुठल्याही प्राचीन वाङ्मयात हिंदू-हिंदुस्थान हा शब्द नाही. या भूभागावर आक्रमण झाले, तेव्हा सिंधु नदीच्या तीरावरचे म्हणून हिंदू हे नाव मिळाले. त्याचेच पुढे हिंदुस्थान असे नाव झाले. आम्ही आर्य आणि आमचा देश आर्यांचा ही तेव्हा ओळख होती. आज ‘मी भारतीय’ अशी भावना दृढ व्हायला हवी.’
कामत म्हणाले, ‘आद्य शंकराचार्यांनी भारताची पदयात्रा करून चार दिशांना चार पीठे स्थापन केली. त्यातून विविध आचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास निर्माण केला. शंकराचार्यांनी केलेले हे कार्य राष्ट्रीय ऐक्याचेच होते. नव्या पिढीला या विषयाची माहिती होणे आवश्यक असून त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत.’
‘मध्यप्रदेश शासनाने शंकराचार्य यांच्या व्यापक कार्याची ओळख करून देण्यासाठी एकात्मता यात्रा आयोजित केली होती. राज्यातील सामान्य प्रजाजनांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा नव्या पिढीला राष्ट्रीय कार्याची माहिती व्हावी यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबवावा’, अशी इच्छा कामत यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी निवेदन केले.