मी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहे, खासदार अनिल शिरोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:30 AM2019-02-03T02:30:40+5:302019-02-03T02:31:01+5:30
गेली पाच वर्षे पुण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करता आल्या, आणखी काही करायच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.
पुणे - गेली पाच वर्षे पुण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करता आल्या, आणखी काही करायच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. डीपी रस्त्यावर एका सभागृहात त्यांनीच आयोजित केलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या स्नेहमिलन मेळाव्यात त्यांनी याचे सूतोवाच केले. सर्वपक्षातील आपल्या मित्रांचे दर्शनच त्यांनी या निमित्ताने घडवले.
महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी महापौर उल्हास ढोले पाटील, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय महाले, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक प्रशांत बधे तसेच भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक धीरज घाटे अशा अनेकांनी या मेळाव्याला हजेरी लावली. सायंकाळी ७ ते ९ पर्यंत गर्दीचा ओघ होता. बहुतेकांनी शिरोळे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीच अशा स्नेहमेळाव्याचे आयोजन करत आलो आहोत. त्याला सर्वपक्षीय स्वरूप असते. त्यामुळे त्यात राजकीय असे काहीच नाही, फक्त स्नेहीजनांना मनातले सांगावे, भेट व्हावी, गप्पा व्हाव्यात, त्यांचे म्हणणे समजावे, आपले त्यांना सांगता यावे यासाठी मेळाव्याचे आयोजन असते असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते येत होते.
स्नेहमेळाव्यातून वैयक्तिक संपर्क...
गेला आठवडाभर शिरोळे यांच्या या स्नेहमिलन मेळाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. सर्वच नगरसेवकांना त्यांनी यासाठी निमंत्रित केले होते. फक्त नगरसेवकच नाही तर शहरातील आजी, माजी पदाधिकारी, आमदार यांनाही त्यांनी स्वत: फोन करून नक्की या म्हणून आग्रह केला होता. त्याप्रमाणे शनिवारी रात्री हा मेळावा झाला. तिथेच त्यांनी जाहीरपणे घोषणा न करता प्रत्येकाला वैयक्तिक भेटत ‘आपण लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहोत’ असे सांगितले.