मी राष्ट्रवादीतच ! विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपला ' दे धक्का'...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:58 PM2019-12-25T14:58:01+5:302019-12-25T15:16:54+5:30
Maharashtra News : विजयसिंह मोहितेपाटलांना शरद पवारांनी व्यासपीठावर आपल्या शेजारी बसवून घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या..
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती झाली होती. त्यातलं एक प्रमुख नाव होतं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील. त्यावेळी विजयसिंह मोहितेपाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राज्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र त्यांनी आज ' मी राष्ट्रवादीत' च असल्याचा मोठा गौप्यस्फोट करत एकप्रकारे भाजपला 'दे धक्का' दिला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित आहेत. आज बुधवारी ( दि. २५) पुण्यातील या कार्यक्रमात मोहितेपाटलांना शरद पवारांनी आपल्या शेजारी बसवून घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. राजकीय तर्कवितर्कांना मोठ्या प्रमाणात उधाण आले. तो कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयसिंह मोहिते पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्याच रणनीतीचा भाग म्हणून माळशिरस मतदारसंघाचे विजयसिंह मोहिते पाटलांच्या सुपुत्र रणजितसिंह पाटील यांनी भविष्यातील राजकीय वारे ओळखून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय चित्र बदलले. अनपेक्षितपणे महाविकासाआघाडीचे सरकार आले. आणि अनेक नेत्यांनी आपली भूमिका सोयीस्कररीत्या बदलल्या. विजयसिंह मोहिते पाटलांनी आज पुण्यात पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या सर्व सभेनंतर ' मी राष्ट्रवादीत' च असल्याचा खुलासा केला. प्रचारादरम्यान उघड उघड जरी भाजपचा प्रचार केला नसला तरी मुलाच्या विजयासाठी आतून बरेच सूत्रे हलवल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यांनी भाजपला दे धक्का देत मोठे विधान केले आहे. भाजपकडून याला कसे प्रत्युत्तर मिळते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.