"मी घाबरत नाही..., माझे कार्यकर्ते, पोलीस झोपले नाहीत"; चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून जत्रेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:54 PM2022-12-17T17:54:56+5:302022-12-17T17:58:32+5:30
सांगवी येथे महापालिकेच्या पवनाथडी यात्रेस चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली...
पिंपरी : एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेसशिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही, एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. 17) केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड शहरात आले होते. सांगवी येथे महापालिकेच्या पवनाथडी यात्रेस त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मागील शनिवारी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. पवनाथडी जत्रेवेळी त्यांनी त्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले, कोणाला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. त्यांना घाबरून मी फेसशिल्ड लावली नाही तर माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी मी फेसशिल्ड लावली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
मागील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. त्यावेळी तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस दलातही मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा शाई फेक करणार असल्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता. त्या पार्शवभूमीवर सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच पवना थडी जत्रेतही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.