मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण
By राजू हिंगे | Published: November 15, 2024 07:13 PM2024-11-15T19:13:07+5:302024-11-15T19:13:43+5:30
महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारसभा आणि बैठका यांना वेग आला आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागणार आहे. महायुती असो की महाविकास आघाडी, मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, महायुतीतील मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत, तर आघाडीतील उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील या नावांचीही चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर विनोद तावडेंचे नाव अचानक चर्चेत आले. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देत तावडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विनोद तावडे म्हणाले, "मी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकार सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्ली येथे चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल," असे तावडे म्हणाले.
"बटेगे तो कटेंगे"ला माझा पाठिंबा
""बटेगे तो कटेंगे"" हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती-जातींमध्ये लोक विभागले गेले की त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेतात, त्यामुळे काही जण विरोध दर्शवतात," असे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. "लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या, पण आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतविभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील," असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. राज्यभर प्रचार दौरे करताना सामान्य मतदारांची भावना समजून घेतल्यास महायुती स्पष्ट बहुमताच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांची दुटप्पी भूमिका
"लोकसभा निवडणुकीत '४०० पार' नारा दिल्यानंतर मोदी पुन्हा निवडून येतील, हे लक्षात घेऊन काही लोक मतदानाला आले नव्हते. मात्र यंदा ते नक्की येतील. राज्यात स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर येईल. महायुतीने प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजनांद्वारे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. 'लाडकी बहिण' योजना राज्यात खूप लोकप्रिय ठरली आहे," असे तावडे म्हणाले.
"ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'लाडकी बहिण' योजना राबवताना इतर खात्यांचे पैसे वळवल्याचा आरोप केला, मात्र स्वतःच्या जाहीरनाम्यात तीच योजना राबवण्याचे वचन दिले आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. शरद पवार यांच्या सभांचे नियोजन करणारी व्यक्ती पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांचे सभांचे आयोजन करत असल्याचे दिसते. मात्र, पाऊस पडल्याने जागा जिंकता येते, हा भ्रम आहे. " असेही तावडे म्हणाले.