'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 03:20 PM2022-05-29T15:20:11+5:302022-05-29T15:59:29+5:30
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य केले होते
पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना 'तुम्ही घरी जा स्वयंपाक करा' हे वक्तव्य केले होते. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात थेट पाटील यांनाच या वक्तव्याचा खुलासा करा असे पत्र पाठवले होते. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी खुलासा करत रुपाली चाकणकर यांना पत्र पाठवले आहे. सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे ते पत्रात म्हणाले आहेत.
राज्य महिला आयोगाकडे पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात हा महिलांचा अवमान आहे इथपासून ते महिलांच्या बाबतीत असा विचार केला जात असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करणारी पत्रेही होती. पुणे शहर लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. असीम सरोदे यांच्या याच आशच्याच्या पत्राचाही त्यात समावेश होता. त्यामुळेच आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट पाटील यांनाच एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी तुमचे हे वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्माला ठेच पोहचवणारे आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३, कलम१२ (२), व १२ (३) नुसार या वक्तव्याचा येत्या दोन दिवसात आयोगाकडे लेखी खुलासा सादर करावा असे आयोगाच्या पत्रात चाकणकर यांनी नमुद केले होते. त्यानुसार पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मी दिलगिरी व्यक्त करतो
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा . प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते. यासारखे आयुष्यात दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. असे चंद्रकांत पाटलांनी महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.