“मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो...”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:38+5:302021-08-14T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो आदर्श उभा केला आहे आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो आदर्श उभा केला आहे आणि जी शिकवण दिली आहे. त्याचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो,” अशा खास मराठमोळ्या शैलीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभीष्टचिंतन करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणे ही मोठी गोष्ट असल्याची भावना शिवशाहिरांनी व्यक्त केली.
निमित्त होते ओजस्वी वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणाऱ्या शिवशाहीर पुरंदरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे. तिथीनुसार शुक्रवारी (दि.१३) शिवशाहिरांनी शंभरीत पदार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाबासाहेबांची असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी कौतुकाद्गार काढले. “शिवाजी महाराजांचे जीवन आणि विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले त्याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे ऐतिहासिक पुरुष असले तरी वर्तमानही त्यांच्या अमरगाथांनी प्रभावित आहे. वर्तमान आणि भविष्याचा एकच प्रश्न आहे की शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय भारताच्या गौरवाची कल्पना करणेदेखील मुश्किल आहे.”
ऐतिहासिक कालखंडात छत्रपती शिवरायांची जी भूमिका होती तिच भूमिका त्यांच्या गाथांमधून निरंतर पुढे चालत आली आहे. हिंदवी स्वराज्य, अनुशासन, वंचितांना न्याय देणे, नौसेनाची उपयुक्तता हे त्यांचे प्रयोग आजही अनुकरणीय आहेत. बाबासाहेब यांनीच नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे हे रूप अवगत करून दिले. शिवाजी महाराजांविषयीच्या गोष्टी सांगण्याच्या बाबासाहेबांच्या शैलीतून प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांची प्रतिमा जिवंत होते. ‘जाणता राजा’च्या प्रारंभीच्या काळात हा प्रयोग पाहण्यासाठी मी पुण्यालाही गेलो होतो. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आज देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाचा इतिहास लिहिताना बाबासाहेबांसारखीच प्रेरणा आणि प्रामाणिकतेच्या कसोटीवर लेखन करावे,” असे आवाहनही मोदी यांनी तरुण इतिहासकारांना केले.
---------------------