"माझ्या जीवनातील समस्या मी सोडवू शकत नाही", तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:51 AM2022-01-03T11:51:54+5:302022-01-03T11:52:19+5:30
आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली
धनकवडी/पुणे : आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला, असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली. अग्निशामन दलाच्या जवानाने आज सकाळी ९ वाजल्या सुमारास तलावातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
जीवनात आलेल्या नैराश्यातून २३ वर्षीय युवकाने कात्रज भिलारेवाडी येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने घरच्यांना मेसेज केला होता. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. शंकर बसवराज कलशेट्टी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असून शिवविच्छेदन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शंकर ने रविवारी रात्री उशिरा घरच्याना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. मेसेज पाहताच घरातील सदस्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली, भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री दीड दोन वाजेपर्यंत तपास केला. दरम्यान रविवारी सकाळी पुन्हा तपास केला असता भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल दिसल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन केंद्राला कळविले. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. शंकर ने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने हाताची नस कापली होती.
म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला
माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या फक्त वाढतच आहेत. या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेउन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता आजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही. आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला़ पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करून शंकर ने आत्महत्या केली.