मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:09 PM2024-11-25T14:09:38+5:302024-11-25T14:15:00+5:30
"राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत आहे," असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
Laxman Hake ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चितपट करत महायुतीने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा, यामुळे महायुतीला ऐतिहासिक विजय साकारता आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. मला फक्त विधानपरिषद आमदारकी नको तर गृह किंवा अर्थखातं द्यावं, कारण मी राज्यात ५० टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे, अशी भूमिका हाके यांनी मांडली आहे.
"मला फक्त विधान परिषद नको, कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा इतर कोणतं कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं. कारण मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे," असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंवर निशाणा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला होता. आता विधानसभा निवडणूक निकालानंतरही हाके यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. "मनोज जरांगे यांना लोक कंटाळले आहेत. त्यांनी १३० जागा पाडायची भाषा केली, जिथं उमेदवार पाडण्यासाठी मेसेज दिला, तिथं ते उमेदवार मोठ्या मताधिक्याने लोक निवडून आले आहेत," अशा शब्दांत हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.