बारामतीत उमेदवार कोण माहिती नाही, माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा : खासदार सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:30 AM2024-02-29T11:30:46+5:302024-02-29T11:31:32+5:30

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामतीत २ मार्चला होणारा नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नाही...

I don't know who is the candidate in Baramati, my fight against BJP's views: MP Supriya Sule | बारामतीत उमेदवार कोण माहिती नाही, माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा : खासदार सुप्रिया सुळे

बारामतीत उमेदवार कोण माहिती नाही, माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा : खासदार सुप्रिया सुळे

बारामती (पुणे) : माझ्याविरोधात लोकसभेला कोण उमेदवार असेल ते माहीत नाही. पण जेव्हा घोषणा होईल तो उमेदवार भाजपच्या विचाराचा असेल. माझा भाजपच्या विचारांविरोधात लढा आहे. त्यामुळे वैयक्तिक कोणाविरुद्ध लढाई नसून ती वैचारिक असेल, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामतीत २ मार्चला होणारा नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नाही. बारामतीत हे कार्यक्रम होत असल्याची माहिती मला पत्रकारांकडूनच मिळालेली आहे. २०१५ च्या शासनाच्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकसभा, राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते. बारामतीत तो प्रोटोकाॅल पाळला जातो की नाही? हा प्रश्न आहे. आम्ही सत्तेत असताना प्रोटोकाॅलचे काटेकोर पालन करत होतो. तत्कालीन स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पत्रिकेत नाव नसल्याने तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमाला येणे टाळले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर माझा विश्वास असून, ते मला महारोजगार मेळाव्याला बोलवतील, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली. शरद पवार यांनी ५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नमो महारोजगार मेळावा होतो आहे. ही संस्था त्यासाठी उपयोगी येते, याचा आनंद असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवाय विकासकामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री व मान्यवर येत असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे त्या म्हणाल्या.

लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना मी कधीही आमदारांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. केंद्रातील कामांचा मी पाठपुरावा करत होते. आमदार राज्यातील कामांचा पाठपुरावा करायचे. बारामतीतील काम असेल तर मी अजित पवार यांच्याकडे संबंधितांना पाठवायचे. तीच पद्धत इतर तालुक्यांत वापरत होते. सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहता, गृह मंत्रालय अपयशी ठरले आहे. सत्ताधारी आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. कोयता गॅंग, ड्रग्ज रॅकेट सापडत आहेत. गृह मंत्रालय काय करतेय? असा सवाल त्यांनी केला. राज्यात आत्महत्या, गुन्हेगारी, बेरोजगारी वाढल्याची टीका सुळे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲड. संदीप गुजर, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे आदी उपस्थित होते.

...हा दरबार नाही

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बुधवारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. जनता दरबार असा पत्रकारांनी उल्लेख केल्यावर सुळे यांनी दरबार या शब्दाबाबत हरकत घेतली. हा दरबार नाही. आमच्या कार्यकर्त्यांकडून तसा ‘मेसेज’ गेला असल्यास मी माफी मागते. हा जनता दरबार नसून जनतेच्या सेवेसाठी मी येथे असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Web Title: I don't know who is the candidate in Baramati, my fight against BJP's views: MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.