बहुजनांच्या मतांवर डाेळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही : विनाेद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 02:06 PM2018-07-02T14:06:52+5:302018-07-02T14:12:32+5:30
सिंबायाेसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवी प्रदान साेहळ्यानंतर पत्रकारांशी बाेलताना तावडे यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
पुणे : राज्य सरकारने शाळा बंदचा घेतलेला निर्णय हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही अशी टीका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्याला उत्तर देताना बहुजनांच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही असे म्हणत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
सिंबायोसिसच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू व्यक्ती निवडणूका जवळ अाल्या की राजकीय बाेलतात याचा जुना अनुभव अाहे, ताेच अाता येत असल्याचेही तावडे यावेळी म्हणाले. तसेच फुले, शाहू, अांबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर अामचा भर अाहे. असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटबाबत बाेलताना सिंहगडचे प्राध्यापक उच्च न्यायालयात गेल्याने सिंहगडचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट अाहे त्यामुळे त्यावर अधिक काही बाेलता येणार नाही, परंतु सरकारच्या हातात जे काही आहे ते सर्व सरकार करीत अाहे. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवली असून क्लाॅक बेसिसवर काम करणाऱ्या प्राध्यपकांचे मानधन वाढविण्याचा विचार सरकार करत असल्याचेही तावडे यावेळी म्हणाले.
दरम्यान साहित्य संमेलनाची निवडणूक बंद केल्याबाबत साहित्य महामंडळाचे अभिनंदनही तावडे यांनी केले. तसेच यापुढे साहित्य संमेलन हे वादाविना पार पडेल व रसिकांना साहित्याचा अानंद लुटता येईल अशी अाशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.