...म्हणून महात्मा फुलेंच्या पागोट्याचा आग्रह धरला; पगडी प्रकरणावर पवारांकडून पडदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 02:37 PM2018-06-16T14:37:37+5:302018-06-16T14:37:37+5:30
सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात त्यामुळे ती पगडी वापरता येत नाही.
पुणे : मी पुण्यात वाढलो आहे याचा मला अभिमान आहे. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझा आदर्श आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र यातून कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिले. या पगडी प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पद्मावती येथील डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंदचे भिंती शिल्पाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, कामगार नेते बाबा आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की,सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात त्यामुळे ती पगडी वापरता येत नाही. डॉ आंबेडकर यांनी परदेश हॅट वापरली असली तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळे समतेचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचे पागोटे घालण्यात यावे अशी माझी इच्छा होती असेही त्यांनी स्पष्ट केले.
१० जून रोजी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पवार यांनी आवर्जून छगन भुजबळ यांचा महात्मा फुले पगडी देऊन सन्मान केला होता. त्यावरून सर्वत्र विविध अंगांनी चर्चा सुरु झाली होती. मात्र पवार यांच्या आजच्या स्पष्टीकरणाने त्यांच्या बाजूने तरी या विषयावर पडदा टाकण्यात आल्याचे सांगितले जाते.