काहींना मी पक्षात नकोय, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना उत्तर देणार; वसंत मोरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:04 PM2022-05-15T18:04:40+5:302022-05-15T18:04:53+5:30
वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरु
पुणे : राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. व त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे हे मनसे सोडणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. पण त्यांनी मी पक्षातच राहणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले. परंतु शहर कार्यालयात पाऊल ठेवणार नाही असंही ते म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरु झाली होती. आज तोच वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.
साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आयोजिय करण्यात आला होता. मात्र हा मेळावा सुरू झाल्यानंतर वसंत मोरे अनुपस्थित असल्याने विविध चर्चां रंगू लागल्या होत्या. मेळावा सुरू झाल्याच्या जवळपास अर्धा तासानंतर वसंत मोरे त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांबद्दल मोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मला पक्षातून डावलण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षात नकोय. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. बैठकीनंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोरे म्हणाले, मला काल रात्री उशिरा मेळाव्याच्या नियंत्रणाची पत्रिका आली होती. त्या पत्रिकेत कोअर कमिटीतील दहा जणांची नावे होती. पण माझे नाव वगळण्यात आले होते. मला वारंवार असं जाणवायला लागलाय कि, मला पक्षातून डावललं जात आहे. याबद्दल मी अनिल शिदोरे यांना कळवलं आहे.
वसंत मोरे याना कोणीही टार्गेट करू शकत नाही
तुम्हाला टार्गेट केलं जातंय का? असं वसंत मोर यांना विचारलं असता ते म्हणाले, मी आधीही पक्षातच होतो. आणि शेवटपर्यंत पक्षातच राहणार आहे. काहींना मी पक्षात नकोय. म्हणून ते अशा मेळाव्यांना मला बोलवत नाहीत. पण मी आता काही जास्त बोलणार नाही. येत्या महापालिका निवडणुकीत माझ्या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार आहे. मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते करून शकत नाहीत असंही मोरे यांनी यावेळी सांगितलं आहे .