"मी दारू पिताेय, माझ्याकडे परवाना नाही तरीही बापाने गाडी दिली" आराेपी मुलाचा कबुली जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:11 AM2024-05-21T09:11:48+5:302024-05-21T09:12:32+5:30
अल्पवयीन आरोपी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा आहे...
पुणे : मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली.
अल्पवयीन आरोपी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी दिली म्हणून वडील विशाल अगरवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल न्याय मंडळासमोर रविवारी (दि. १९) वडिलांनीही मुलाला दारूचे व्यसन लागल्याचे मान्य केले होते. हे सर्व माहिती असूनही मुलाच्या हातात कार देणारे वडीलदेखील तितकेच दोषी असल्याचे दिसून येत आहे.