मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:30 AM2024-05-21T06:30:55+5:302024-05-21T06:31:31+5:30
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले.
पुणे : मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करताे हे वडिलांना माहिती आहे, असे आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली.
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आरोपी अल्पवयीनच असून, जन्माचा पुरावा मिळाला आहे. मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनारजिस्ट्रेशन हाेती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, अपघातग्रस्त कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी
अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. मुलाला न्यायालयाने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. तसेच, ‘अपघात’ या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली. तसेच येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करणार आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या करोडपतीच्या मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा शिक्षा असतात का, असा सवाल शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.
आरोपीला व्हीआयपी वागणूक
अल्पवयीन मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पिझ्झा बर्गरही बाहेरून आणून दिल्याचे ते म्हणाले. अपघाताबाबत अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. कँडल मार्च काढले गेले. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्याची तसदी कुठल्याही नेत्याने, नागरिकाने घेतली नाही, असा खेदही व्यक्त केला. अश्विनी, अनिस यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.