पुण्यात वाहतूककोंडी, मंत्र्यांनाच बसला फटका..! बावनकुळे यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:19 IST2025-01-30T10:18:54+5:302025-01-30T10:19:27+5:30
वाहतूककोंडी सोडवण्याचे काम आमचेच आहे, अशी कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यात वाहतूककोंडी, मंत्र्यांनाच बसला फटका..! बावनकुळे यांची कबुली
पुणे : शहरातील वाहतूककोंडीमुळे कार्यक्रमाला पोहाेचायला उशीर झाला, मी वाहतूककोंडीत अडकलो, हे तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटते. शहराची वाहतूककोंडी सोडवण्याचे काम आमचेच आहे, अशी कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आधार सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अटलशक्ती’ आणि ‘अटलसाधना पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी नॅशनल असोशिएशन फाॅर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्लूपीसी) संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल देशमुख यांना अटकशक्ती, तर भारतीय वारकरी मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर टाकळकर, गणेशनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष अरविंदनाथ गोस्वामी, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, धर्मवीर शंभूराज प्रतिष्ठानचे संस्थापक मारुती तुपे, जेजुरी येथील खंडोबा मंदिराचे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, कब्बड्डीपटू स्नेहल शिंदे-साखरे, मोडी भाषा अभ्यासक परशुराम जोशी यांना अटल साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आयोजक सविता काळोखे, दिलीप काळोखे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, समर्पण, कर्तृत्व आणि त्याग यांचा संगम म्हणजे वाजपेयी होते. त्यामुळे पुरस्कारापेक्षा पुरस्काराचे नाव महत्त्वाचे आहे. जीवन कसे जगावे, याची प्रेरणा वाजपेयी यांनी दिली. त्याला अनुसरून केवळ आपण आणि आपले कुटुंबीय यांच्यापुरता विचार न करता समाजासाठी काय करू शकतो, असा संकल्प आपल्या जीवनात करता येईल का?, हा विचार केला पाहिजे.