Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:25 PM2024-08-26T13:25:28+5:302024-08-26T13:26:43+5:30
मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. दर्शन घेतल्यावर जगाला कळावे याला काही अर्थ नाही
पुणे : मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण मी त्याचा गाजावाजा करीत नाही. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर जगाला कळावे याला काही अर्थ नाही. मी दर्शन घेताे, दाेन मिनिटे तिथे थांबतो आणि निघून जाताे. याचे जे मानसिक समाधान असते ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाच्या समारोप साेहळ्यात पवार बाेलत हाेते. यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे उपस्थित हाेते. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य वाटप, तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल वारकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पवार म्हणाले, वारकरी संमेलनातून समाजमन तयार करणे आणि ते पुराेगामी विचारावर आधारित असले पाहिजे. राज्यात वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडी या नावाने काम करणारे अनेक लाेक आहेत. मात्र, त्यांचे कीर्तन, विचार ऐकायचा प्रसंग येताे. तेव्हा मी फार अस्वस्थ हाेताे. ज्यांनी सामाजिक ऐक्य घडविणे, कर्मकांड, जुन्या प्रवृत्ती याच्याविराेधात भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तेच जात, पात, धर्म याची एक वेगळी भूमिका जनमानसासमोर मांडतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसत असेल तर ताे खऱ्या अर्थाने ताे वारकरी सांप्रदायाचा विचार नाही. आशा लाेकांची संख्या वाढली असून, ते आपले विचार जाहीरपणे मांडतात आणि पिढ्यानपिढ्या एकसंघ राहणाऱ्या समाजात छाेट्या प्रसंगावरून कटुता निर्माण करीत आहेत.
संतांच्या विचारांत शांतता, बंधुभाव निर्माण करण्याची ताकद
संतांनी आपल्याला दिलेले प्रचंड वैचारिक धन ही आपल्या जमेची बाजू आहे. त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण करणारे मैत्री भाव विस्तारित करणारा जनमानस तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ती संत विचारातून हाेऊ शकताे. जगात आज शांतता आणि बंधुभावाची गरज आहे आणि त्याची पूर्तता करण्याची ताकद माऊली आणि तुकोबांच्या विचार, अभंगात आहे, असेही पवार यांनी सांगितले.
वारकरी एकवटले तर क्रांती हाेणार : संजय आवटे
संत ज्ञानेश्वर ज्या वेळी ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणाले तेव्हा अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. ही आपली परंपरा आहे. ती लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि संतांची समतेची वाट प्रशस्त करणे गरजेचे आहे. मी वारकरी आहे, पण मला राजकीय भूमिका नाही, तर त्यांना संत कळाले नाहीत. या संतांचे साहित्य, अभंग हे राजकीय स्टेटमेंट हाेते. संतांनी वेगळी वाट शोधणे अन् वेगळा विचार करायला शिकविले. आपण नव्या पिढीपर्यंत संत तुकाराम, ज्ञानेश्वर पाेहाेचविले पाहिजेत. वारकरी एकवटले तर क्रांती हाेणारच, असा विश्वास आवटे यांनी व्यक्त केला.