प्रश्नचिन्हांना करायचे होते उद्गारवाचक!
By admin | Published: May 12, 2017 05:34 AM2017-05-12T05:34:32+5:302017-05-12T05:34:32+5:30
गायन, निवेदन, व्याख्याने, डबिंग, पत्रकारिता यांसारख्या सर्व क्षेत्रात ती लीलया कर्तृत्व गाजवत होती; पण दोन वर्षांपूर्वी डेंग्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गायन, निवेदन, व्याख्याने, डबिंग, पत्रकारिता यांसारख्या सर्व क्षेत्रात ती लीलया कर्तृत्व गाजवत होती; पण दोन वर्षांपूर्वी डेंग्यू झाला आणि त्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिची दृष्टी गेली. या अचानक कोसळलेल्या संकटावर तिने तितक्याच सक्षमतेने मात केली. कारण, तिला आयुष्यातील सर्व प्रश्नचिन्हांचे उद्गारवाचक चिन्ह करायचे होते. ही कहाणी आहे अनघा मोडक यांची.
सुधीर गाडगीळांसारख्या कसलेल्या मुलाखतकाराने एवढे मोठे संकट कोसळलेल्या परिस्थितीत आयुष्याकडे कसे पाहिले, या विचारलेल्या प्रश्नावर अनघा मोडक यांनी आयुष्याच्या सकारात्मक दृष्टीचे गमक उघड केले.
हिंदू महिला सभा पुणेतर्फे ‘ज्योतिर्मयी पुरस्कार’ विलेपार्ल्याच्या निवेदिका, वक्त्या अनघा मोडक यांना महापौर मुक्ता टिळक व ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी मोडक यांनी आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोनाचे गमक उघड केले.
कार्यक्रमात खरं तर अनघा यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नव्हता; पण सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करण्याऐवजी त्यांना मुलाखतीद्वारे बोलते केले.
एका प्रश्नाला उत्तर देताना अनघा म्हणाल्या, ‘अपघाताने नैराश्याच्या खाईत असताना मला माझ्या गुरूंनी खूप प्रेरणात्मक विचार सांगितला, तो म्हणजे ‘बाहर बहोत देख लिया थोड़ा अंदरभी देख लो’! सुरेश खरे, गुरू ठाकूर, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, धनश्री लेले आणि अमोद खळदकर यांनी मला आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन दिला.’
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अनघा मोडक यांनी सावरकरांच्या आयुष्यावरील ‘गुणाकिंत’ हा कार्यक्रम सादर केला. यात त्यांना रमा कुलकर्णी यांनी विविध रचना सादर करून सुरेल साथ दिली. सुप्रिया दामले यांनी प्रास्ताविक केले. सुनीता अभ्यंकर यांनी आभार मानले.