'... पवार साहेबांचा शब्द अंतिम'; वळसे पाटलांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:34 PM2023-11-10T12:34:27+5:302023-11-10T12:35:12+5:30
आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. ही भेट का घेतली याचे कारण स्वत: मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण
मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, चार पाच दिवसापूर्वीच आमची ही भेट ठरली होती. रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी या बैठकीसाठी आले होते, संस्थेत कोणतीही खांदेपालट होणार नाही. संभ्रम होण्याचे कारण नाही. ज्या संस्था आहेत त्या संस्थेवर मी कोणत्या कोणत्या पदावर काम करत आहे. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, राज्य सहकारी संघ या संघावर आम्ही काम करत आहे. या संस्थेत काम करत असताना आम्ही शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतो. आताही आम्ही मार्गदर्शन घेऊन या संस्थांचा पुढे कारभार घेऊन जाण्याच्या संदर्भात आज काही प्रश्नांसाठी भेट घेतली.
"राज्यातील दुष्काळ संदर्भात काही निर्णय घेतले आहे. ते निर्णय आज आम्ही साहेबांच्या कानावर घातले आहेत. पहिल्या दिवसांपासून मी शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. पाडव्या दिवशी भेट घेणार की नाही ते अजुनही ठरवलेलं नाही. राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे. संस्थांमध्ये राजकारण आणलेलं नाही. संस्थात्मक राजकारणात शरद पवार साहेब अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचाच शब्द अंतिम असणार आहे, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
खासदार शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी आहेत, या ठिकाणी अनेक नेत्यांनी पवार यांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे. दिलीप वळसे पाटील हे अगोदर खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण, त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतली.
काल राष्ट्रवादी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. तर दुसरीकडे आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात होते.