लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेरे मारले नाहीत, याबाबत मी भाग्यवान: रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:50 PM2022-06-14T12:50:02+5:302022-06-14T12:52:15+5:30
राज्यात आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
पुणे-
राज्यात आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. "वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात रोखठोक मत व्यक्त केलं. समाजात अनेक अनिष्ठ प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी वटपौर्णिमेवर देखील भाष्य केलं. "आपला समाज महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेऊन त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. वटपौर्णिमेचं उदाहारण घ्या. अनेक महिला वडाला फेरे मारतात. सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात. पण त्यातीलच काही महिला नवरा त्रास देतो म्हणून तक्रारही करत असतात. शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते", असं चाकणकर म्हणाल्या.
"माझा आणि वटपोर्णिमेचा संबंध आला नाही. म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून मी एकदाही वटपोर्णिमेला वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही. माझ्या नवऱ्याने तर कधीच तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे", असंही त्या म्हणाल्या. तसंच "आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही, हे आमचे दुर्दैव आहे. खरं तर ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे", अशी खंत चाकणकर यांनी बोलून दाखवली.