वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही: सदगुरू जग्गी वासुदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:38 AM2022-06-15T06:38:07+5:302022-06-15T06:38:21+5:30
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.
पुणे :
‘जगभर भ्रमंतीचा निर्णय ईशा फाउंडेशनच्या टीमला माहीतही नव्हता. मी ३ जानेवारीला त्यांना माझी कल्पना सांगितली आणि वेळ कमी असला तरी ती प्रत्यक्षात आणण्याचा निग्रहही केला. मला सतत काम करीत राहायला आवडते. मी माझे आयुष्य मनापासून आणि भरभरून जगतो. वृद्ध होण्यासाठीही माझ्याकडे वेळ नाही’, अशा शब्दांत ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.
प्रदूषण रोखून माती संवर्धनाचा संदेश देण्यासाठी २६ देशांचा दाैरा करून ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगळवारी पुण्यात आले होते. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर त्यांनी पुण्यातील मान्यवरांशी संवाद साधला. या वेळी ‘माती वाचवा’चा (सेव्ह सॉईल) जागर करण्यात आला. व्यासपीठावर लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया, अतुल गोयल, जय श्रॉफ, अभय लोढा, आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्गुरू म्हणाले, ‘मानवी शरीरात ६० टक्के जीवजंतू आहेत. जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात आल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. आपण आहार, आरोग्य याबाबत चुकीच्या पद्धतीने विचार करीत असतो. आरोग्याची अतिरेकी काळजी हे आजारपणाचे लक्षण आहे. पोटाला अन्नाची भाषा कळते. कधी, काय आणि किती खावे, हे समजले पाहिजे. आजकाल कार्यक्रमांत जेवणामध्ये २०-२५ पदार्थ असतात. परंतु एकाच वेळी एवढे पदार्थ खाण्याऐवजी एखादाच पदार्थ खाणे योग्य.’
‘शरीराला विश्रांती आवश्यक असते. मात्र, प्रत्येक वेळी झोप म्हणजे विश्रांती नव्हे, यावरही त्यांनी भाष्य केले. चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले.
काय म्हणाले सद्गुरू?
- तुम्ही चांगले खाल्लेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेकही टाळायला हवा. प्रत्येकाच्या जीवनशैलीचा, शरीराचा पॅटर्न वेगवेगळा असतो. त्यानुसार बदल करायला हवेत.
- मातीचा दर्जा घसरत असल्याने आपल्या अन्नाचा दर्जाही खालावत चालला आहे. अन्नातील ९० टक्के पोषक घटक कमी झाले आहेत.
- फळे, भाज्या यांतील सूक्ष्म, पोषक घटकही गेल्या १०० वर्षांत कमी होत चालले आहेत. मातीचे संवर्धन न होणे हे यामागचे कारण आहे.
- आपल्या शरीराचा समतोल जपायचा असेल तर जीवजंतूंचा समतोल आणि मातीचा दर्जाही सांभाळला गेला पाहिजे.
- पृथ्वीवर अब्जावधी विषाणू आहेत. त्यातील केवळ १४ हजार आपल्यासाठी घातक आहेत. तरीही आपण आरोग्याची विनाकारण काळजी घेतो.
- पारंपरिक अन्न खाणे शरीरासाठी फायद्याचे असते. त्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.
‘तुम्हाला पावभाजी, डोसा, इडली, चिली असे चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह होत नाही का?’ असे विचारले असता, ‘माझ्या हातचा मसाला डोसा खाल तर माझे गुलाम व्हाल,’ अशी मिश्कील टिप्पणीही सद्गुरू यांनी केली.