माझ्यात अपयश पचवण्याची हिंमत; परत उभारी घेईन : दिलीप मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:00 IST2025-01-03T17:00:14+5:302025-01-03T17:00:55+5:30
मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.

माझ्यात अपयश पचवण्याची हिंमत; परत उभारी घेईन : दिलीप मोहिते-पाटील
शेलपिंपळगाव / राजगुरूनगर : "मी हरलेलो नाही, मी पुन्हा ताठ मानेने उभा राहील, राजकारणातील यश आणि अपयश हे पचविण्याची हिम्मत दिलीप मोहितेंमध्ये आहे. मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
राजगुरूनगर शहरात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बालजत्रा व खाऊगल्ली जत्रेत नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेखाताई मोहिते पाटील, अनिल राक्षे, मंगल चांभारे, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका युवक अध्यक्ष वैभव घुमटकर, शहराध्यक्ष सागर सातकर, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संतोष भांगे, पप्पू बनसोडे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, माजी अध्यक्ष ॲड मनीषा टाकळकर, ॲड. सुनील वाळुंज, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक महिला उपस्थित होते.
दरम्यान, वन संरक्षणासाठी काम करणाऱ्या राजगुरूनगर येथील सपना राठोड यांना विशेष पुरस्कार देऊन माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजगुरूनगरमध्ये नुकतीच दोन लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या झाल, त्या दोन्ही चिमुकल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव घुमटकर, तर सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले.
कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली
मध्यमवर्गीय नागरिकांना दि. ३१ डिसेंबर साजरा करता येईल असे नाही, म्हणून खाऊगल्ली आणि बालजत्रेचे आयोजन करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात अनेक कुटुंबे सहपरिवार सहभागी झाले. खाऊगल्लीत जवळपास ६० पेक्षा जास्त स्टॉल बचतगट आणि महिलांनी उभारले. याशिवाय बालजत्रेत विविध खेळणी पाळणे, पाण्याचा तलाव होड्या, रेल्वे, लहान मुलांची खेळणी आदी चीज वस्तूचा बालचमूंनी आनंद घेतला. यातून महिलांना मोठी आर्थिक कमाई झाली. शैलेश लोखंडे यांच्या ‘अभिमान महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात २५ महिलांना पैठणी, तर ५०० महिलांना साडीचे बक्षीस मिळाले.
मी हरलेलो नाही, मी पुन्हा ताठ मानेने उभा आहे. ज्यांनी ज्यांनी मला ताकद दिली त्या कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील. त्यांच्या उत्साहात कोठेही कमी पडणार नाही. पुढे अनेक निवडणुका आहेत. यात सर्वांनी भविष्याचा निर्णय घ्यावा.
- दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार