भारतात राहिलो म्हणून हाती लेखणी, अफगाणिस्तानात असतो तर बंदूक असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:14+5:302021-09-04T04:14:14+5:30
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांची भावना तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती खूपच भयंकर आणि चिंताजनक बनली आहे. कधी मृत्यू तुम्हाला ...
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांची भावना
तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती खूपच भयंकर आणि चिंताजनक बनली आहे. कधी मृत्यू तुम्हाला गाठेल याचा नेम नाही. तालिबानी हे क्रूरकर्मा आहेत. बंदुकीच्या जिवावर हुकुमत गाजविणारी ही मंडळी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. मी शिक्षणाच्या निमित्ताने भारत गाठले म्हणून हाती लेखणी आली, अन्यथा तालिबान्यांशी लढण्यासाठी अथवा माझा जीव वाचविण्यासाठी मी निश्चितच बंदूक उचली असती. ही भावना आहे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या झबिउल्लाह राहिमी या तरुणाची.
झबिउल्लाह राहिमी हा मूळचा काबूलचा. त्याने शिक्षणाच्या निमित्ताने जुलै २०२१ मध्ये पुणे गाठले. बीबीए , एम.कॉम. हे शिक्षणदेखील त्याने पुण्यातच घेतले. आता तो व्यवस्थापन या विषयांत पीएचडी घेण्यासाठी पुन्हा एकदा भारतात आला. अफगाणिस्तानातील सद्यस्थितीविषयी बोलताना त्याला गदगदून आले. त्याचे संपूर्ण कुटूंब
अफगाणिस्तानात आहे. तालिबानच्या भीतीने कुटुंबीयांनी काबूलमधून पलायन केले. आता ते काबूल शहरापासून दूर कोणत्या तरी डोंगराजवळच्या खेड्यात जीव वाचावा म्हणून आश्रय घेतला. काबूलमध्ये असताना सतत बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव त्यांनी तिथे पाहिला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचा खच, आप्तांना गमावल्यावर दाटणारा आक्रोश, हे सारेच त्यांनी तिथे अनुभवले. ते आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी काबूल सोडला. आता आठवड्यातून एकदा घरी बोलणे होते. तेदेखील फोन लागला तर, अनेकदा फोनदेखील लागत नाही. लागला तरी स्पष्ट आवाज येत नाही. घरच्यांच्या सुरक्षेची चिंता कायम सतावते. जोपर्यंत तालिबानी आहेत तोपर्यंत अफगाणिस्तानात जाणे आता मला शक्य नाही.
कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी फोटो जाळायला सांगितले :
झबिउल्लाह राहिमी याने चार वर्षे अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात दुभाषकाचे काम केले. त्याचे त्या संदर्भातले काही महत्त्वाचे कागदपत्रे व फोटो घरीच होते. ते जर तालिबान्यांच्या हाती लागले तर भारत सरकारसाठी माहिती पुरविण्याचे काम करतो की काय संशयावरून ते कुटुंबीयांनादेखील संपवू शकतात. त्या भीतीने घरच्यांना सर्व कागदपत्रे व फोटो जाळायला सांगितले असल्याचे राहिमी सांगतो.
पुण्यात शिक्षणाचा दर्जा चांगला म्हणून आलो :
काबूलमध्ये देखील सरकारी शाळासोबत खागसी शाळा आहेत. शिवाय अफगाणिस्तानातील सर्वात मोठे विद्यापीठ काबूल मध्ये आहेत. तसेच कंधार व नंगहारमध्ये देखील शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र भारतात विशेषतः पुण्यात शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मी तिसऱ्यांदा पुणे गाठले.
पुण्यात शिक्षण घेऊन पुन्हा काबूलमध्ये जाऊन आपल्या देशाचा विकास करायचा हे ठरवून आलो होतो. मात्र आता काबूलमधली परिस्थिती खूप भयावह आहे. त्यामुळे जोपर्यंत तालिबानी अफगाणिस्तानातून निघून जाणार नाहीत तोपर्यंत मी घरी परतणार नसल्याचे झबिउल्लाह राहिमी म्हणतो.
शब्दांकन : प्रसाद कानडे