मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना
By श्रीकिशन काळे | Published: May 10, 2024 08:14 PM2024-05-10T20:14:34+5:302024-05-10T20:14:58+5:30
आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत आणि त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी
पुणे: ‘‘आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही तरी शिकत असतो. त्यामुळे ते आपले गुरू असतात. पण मी एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो. असे जे गुरू आहेत, ते म्हणजे रसिक मायबाप आहेत. मी कुठलीही कला सादर करताना तुमच्यासमोर लोटांगण घालतो. तुम्हाला आमचे काम आवडेल नाही तर आम्ही कसले गुरू. खरे गुरू तुम्ही रसिकच आहात,‘‘ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘गुरूमहात्म्य पुरस्कार’ प्रदान सोहळा शुक्रवारी (दि.१०) बालगंधर्व रंगमंदिरात झाला. याप्रसंगी अशोक सराफ, जीवन विद्यामिशनचे प्रल्हाद वामनराव पै, क्विक हिलचे चेअरमन डॉ. कैलास काटकर यांना हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते देण्यात आला
अशोक सराफ म्हणाले, आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत आणि त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी आहे. या सर्वांसमोर माझे फार मोठे कौतूक तुम्ही केले आहे. हा पुरस्कार कधीच विसरू शकणार नाही. मी काही थोर नाही पण तुम्हाला मी तसा वाटलो हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे. आपण थोर असल्याचे दाखवून देणे हे सुखकारक असते. हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही. याला बऱ्याच लोकांची साथ असते.’’
‘‘मला राजदत्त साहेब यांच्या हस्ते पुरस्कार दिला, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्याकडून मी खूप शिकलो. राजदत्त यांनी माझ्याकडून खूप भूमिका काढून घेतल्या. त्यांच्या सिनेमात मी नायक आणि खलनायक अशा व्यक्तीरेखा केल्या. दोन्ही खूप प्रसिध्द झाल्या. आज सर्वप्रकारचे सिनेमे त्यांनी सादर केले आहेत. त्यांच्याकडून मी खूप शिकलो,’’ अशा भावना सराफ यांनी व्यक्त केल्या.