कामावरुन धावत पळत येऊन पाहिलं तर घराची फक्त राख राहिली हाेती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 07:17 PM2018-11-28T19:17:20+5:302018-11-28T19:22:36+5:30
पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत अनेकांची घरे जळून खाक झाली. मुठा कालवा फुटल्याची घटना ताजी असताना या वर्षातील ही दुसरी माेठी घटना घडली अाहे.
पुणे : पुण्यातील पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीला लागलेल्या अागीत शेकडाे झाेपडपट्ट्या जळून खाक झाल्या. या अागीत शेकडाे जण क्षणार्धात बेघर झाले. एका शाळेत काम करणाऱ्या शाेभा कांबळेंना त्यांच्या घराला सुद्धा अागीने वेढल्याचे कळताच त्या घराकडे धावत सुटल्या. घरी येऊन पाहतायेत तर घरात केवळ राख उरली हाेती. अशीच कहाणी इथल्या अनेकांची अाहे.
अाज दुपारी 1 च्या सुमारास वाकडेवाडी भागातील पाटील इस्टेट झाेपडपट्टीला अाग लागली. चिंचाेळ्या गल्ल्या अाणि एकाला लागून एक घरं असल्याने अाग पसरत गेली. त्यातच इथली बहुतांश घरं ही लाकडी वासे वापरुन अाणि पत्र्याची असल्याने लगेचच अाग पकडली. सुरुवातीला पहिल्या गल्लीतील एका घराला अाग लागली अाणि पाहता पाहता ही अाग तिसऱ्या गल्ली पर्यंत येऊन पाेहचली. दूरवरुन या अागीचे लाेळ नजरेस पडत हाेते. अग्निशमन दलाची जवळजवळ सर्वच कुमक मागवण्यात अाली हाेती. पुण्यातील अग्निशमन केंद्रे, पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन केंद्राच्या गाड्या तसेच दाेन्ही कॅन्टाेन्मेंट च्या फायर गाड्या, पीेएमअारडीएची कुमक, बाॅम्बे सॅपर्सचे जवाण, अाणि महापालिकेचे अाणि खासगी टॅंकर अशा 40 हून अधिक गाड्यांच्या सहाय्याने ही अाग विझवण्याचे प्रयत्न करण्यात अाले. तब्बल 3 तासाहून अधिक वेळ ही अाग धुमसत हाेती. जेव्हा अाग विझल्यानंतर येथील रहिवाशांनी अापली घरे पाहिली तर तेथे केवळ राखच उरली हाेती.
शाेभा कांबळेचं संपूर्ण घर या अागीत जळून खाक झालं. जेव्हा त्यांनी अापल्या घराची अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या डाेळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. पाेटाला चिमटा काढून जमवलेली संपत्ती काही क्षणात काेळसा झाली हाेती. काेमल वाघमारे या अापल्या 3 चिमुकल्या मुलींना घेऊन पाटील इस्टेट उड्डाणपुलाच्या खाली बसल्या हाेत्या. काेणीतरी अाग लागली असे अाेरडत अाल्याने त्या अापल्या मुलींना घेऊन बाहेर पळत सुटल्या. अागीत घर जळाले की नाही याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. इस्माईल शेख अाणि त्याची अाई जळालेल्या घराकडे हताश हाेऊन पाहत हाेते. अाता राहायचं कुठं अाणि खायचं काय असा प्रश्न त्यांना पडला हाेता. अागीत घर जळालेला प्रत्येकजण हताश हाेऊन अश्रू ढाळत हाेता. अाग नेमकी कशी लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.