Narendra Dabholkar Case: पहिल्यांदाच कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं, त्यामुळे १२ दिवस कुणाला सांगितलंच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:18 PM2022-03-31T14:18:21+5:302022-03-31T14:18:36+5:30

पुणे : डॉ. दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली. घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे पहिल्यांदाच कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात ...

I saw someone in a pool of blood for the first time, so I didn't tell anyone for 12 days | Narendra Dabholkar Case: पहिल्यांदाच कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं, त्यामुळे १२ दिवस कुणाला सांगितलंच नाही

Narendra Dabholkar Case: पहिल्यांदाच कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं, त्यामुळे १२ दिवस कुणाला सांगितलंच नाही

Next

पुणे : डॉ. दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली. घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे पहिल्यांदाच कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. पण आसपासच्या लोकांना सांगितल्याचे आठवत नाही. वरिष्ठांनाही माहिती दिली नाही. घरी गेल्यानंतर टीव्हीवर खुनाची बातमी पाहिली. वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या, बातम्यांमध्ये मारेकरी मिळत नसल्याचे कळाले होते. २ सप्टेंबर २०१३ पर्यंत मी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला घटना पाहिल्याचे सांगितले नाही, असे सफाई कर्मचारी असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने उलटतपासणी दरम्यान सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केलेल्या हल्लेखोरांचे वर्णन, त्यांनी घटनेच्या दिवशी घातलेले कपडे, ओळख परेडमध्ये हेच आरोपी होते का? अशा प्रश्नांच्या सरबत्तीमधून आरोपींना प्रत्यक्षदर्शी ओळखलेल्या साक्षीदाराची बचाव पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.२९) उलटतपासणी घेण्यात आली. १२ एप्रिल रोजी पुन्हा उलटतपासणी होणार आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुणे महानगरपालिकेच्या साफसफाई विभागातील कर्मचाऱ्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि ते दोघे तेथून फरार झाले असल्याची साक्ष नोंदविली होती. त्यावर बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळसिंगीकर व ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ओळख परेड दरम्यान किती जण होते? त्यात हे आरोपी होते का? आरोपींना ओळखलेत का? असा प्रश्न बचाव पक्षाने केला. कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये मी कोणालाही ओळखले नव्हते. सीबीआयने आरोपींची छायाचित्रे दाखविण्यापूर्वी मी त्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रात पाहिली होती, असे सांगितले. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, साक्षीदाराने ओळखलेल्या दोन आरोपींची पोलीस परेड झालेलीच नाही. बचाव पक्ष ज्या ओळख परेडविषयी बोलत आहे ती नागोरी आणि मुंब्राच्या आरोपीची होती. त्यांना या साक्षीदाराने ओळखले नव्हते.

पोलीस आणि सीबीआयच्या सांगण्यावरून साक्षीदाराने आरोपींना कोर्टातच ओळखले. नोकरी जाईल या भीतीने सीबीआय आणि पोलिसांच्या सांगण्यावरून खोटी साक्ष दिली असल्याचा युक्तिवाद ॲड. साळसिंगीकर यांनी न्यायालयात केला. साक्षीदाराने असे नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले.

Web Title: I saw someone in a pool of blood for the first time, so I didn't tell anyone for 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.