पुस्तक वाचनातून मी बोललो, वारकरी संप्रदायाची माफी मागतो; धीरेंद्र शास्त्री यांचा माफीनामा
By विश्वास मोरे | Published: November 22, 2023 10:58 PM2023-11-22T22:58:51+5:302023-11-22T22:59:17+5:30
देहूत संत तुकोबा चरणी नतमस्तक
विश्वास मोरे
देहूगाव : माझ्याकडे आलेल्या पुस्तकाच्या वाचनातून मी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोललो, त्यांच्यामुळे वारकरी संप्रदाय भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी वारकरी संप्रदायाची माफी मागतो, अशी भावना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देहूत बुधवारी व्यक्त केली. देहूत संत तुकोबा चरणी नतमस्तक होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याविषयी बागेश्वर शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. शास्त्री महाराज पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना संत तुकाराम महाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी घेतला होता. समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून त्यापुढे असली बेजबाबदार वक्तव्य बंद करावित, नाहीतर नाठाळाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा निर्वाणीचा इशारा देहूकर महाराज यांनी दिला होता. तसेच सध्या पुण्यात सुरू असलेल्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांसह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भेट दिली. श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. वादावर पडदा टाकला.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मी एका पुस्तकात लेख वाचला होता. त्यामुळे बोललो, माझा तसा उद्देश नव्हता. मी समजू शकलो नाही. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी महाराष्ट्राची संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे अद्भुत कार्य हे आपणास प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन मोठे समाधान झाले. श्री संत तुकाराम महाराजांनी तपाच्या बळावर बुडवलेली गाथा इंद्रायणी नदीवर तारल्या. त्याही न भिजता, अशी भारतातील संतांची परंपरा आहे. म्हणून मी तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी आलो आलो. संतांचा आशीर्वाद लाभल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल.