‘आय सपोर्ट पीआय गायकवाड’, सोशल मीडियावर हॅशटॅग व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:27 AM2018-10-22T01:27:20+5:302018-10-22T01:27:30+5:30
सोशल मीडियावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत आहेत.
पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना आता सोशल मीडियावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट पीआय मिलिंद गायकवाड’ हा हॅशटॅग व्हायरल होत असून अनेक लोक गायकवाड यांचे फोटो टाकून त्यांना पाठिंबा देत आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकताच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात ५० लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात होता़ त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दबावातून गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करुन विरोधी पक्षांनी त्याच्या निषेधार्थ मोर्चे काढले होते़ मनसे, हमारी अपनी पार्टी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोर्चे काढले़
या घटनेचे मोठे पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटले असून अनेकांनी मिलिंद गायकवाड यांच्याविषयी पोस्ट टाकून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे़
या बदलीमुळे शहर पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ मात्र, त्याचा उघडपणे निषेध करता येत नसल्याने अनेक पोलीस
कर्मचारी आपल्या व्हॉट्स अॅपवर आपल्या डिपीवर मिलिंद गायकवाड यांचा फोटो लावून त्यांना समर्थन दिले आहे़
सध्या फेसबुकवर ‘आय सपोर्ट पीआय मिलिंद गायकवाड’ हा हॅशटॅग वापरुन गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत आहे.