मी कोटीला १० लाख घेतो! डॉ. अनिल रामोड याचा प्रताप, CBI ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 03:16 PM2023-06-11T15:16:22+5:302023-06-11T15:16:33+5:30
डॉ. अनिल रामोड याच्या घरी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ६ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड रक्कम मोजण्यासाठी मागवल्या दोन मशीन
पुणे : भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड याने तक्रारदार वकीलाला ‘मी १ कोटी रुपये वाढविले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील’ असे सांगितल्याचे सीबीआयने केलेल्या रेकॉडिंगमध्ये स्पष्ट झाले आहे.
सीबीआयने डॉ. रामोड याला शनिवारी विशेष न्यायालयात हजर केले होते. अधिक तपासासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी लवादचे प्रमुख म्हणून काम करणारा डॉ. अनिल रामोड याला ८ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने शुक्रवारी अटक केली होती. त्याच्या कार्यालयात १ लाख २६ हजारांची रोकड सापडली. त्यानंतर निवासस्थानी केलेल्या छाप्यात ६ कोटी ६४ लाख रुपये आढळून आले, तसेच १४ ठिकाणी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.
१०० कोटींची प्रकरणे
- सातारा जिल्ह्यातील भवानीनगर, कोरेगाव आणि लोणंद इत्यादी १५ गावांतील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा कमी मोबदला मिळाला होता. त्यांच्या वतीने तक्रारदार वकिलांनी लवादाचे विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्याची पहिली सुनावणी २१ एप्रिल २०२२ रोजी झाली होती. त्याचा निकाल ऑगस्ट २२ पर्यंत येणे आवश्यक होते, तरीही डाॅ. रामोड ही प्रकरणे प्रलंबित ठेवत होता.
- तक्रारदार वारंवार डाॅ. रामोड याला भेटले तरीही तो निर्णय देण्यास टाळाटाळ करीत होता. २६ एप्रिल २०२३ रोजी तक्रारदार हे पुन्हा भेटले असताना रामोड याने त्यांना सांगितले की, तुम्हाला वाढवून मिळणाऱ्या रकमेच्या १० टक्के म्हणजेच समजा १ कोटी रुपये वाढविले, तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, तरच मी तुमच्या बाजूने शेतकऱ्यांचे निर्णय देणार.
- तक्रारदार यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी दाखल केलेली या गावांची प्रकरणे जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांदरम्यान असतील. याच्या १० टक्के किंवा कमी लाचेची रक्कम देण्यास तक्रारदार तयार नव्हते. याबाबत पैसे मिळाल्यावर तो ११ जून रोजी निर्णय देणार होता. त्यापूर्वीच तक्रारदारांनी सीबीआयकडे धाव घेतली होती.
छाप्यात सापडल्या २ हजारांच्याही नोटा
डॉ. अनिल रामोड याच्या घरी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ६ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम मोजण्यासाठी सीबीआयने नोटा मोजण्याची दोन मशीन मागविली होती. त्यात बहुतांश नोटा या ५०० रुपयांच्या होत्या. काही नोटा २ हजारांच्याही होत्या. मात्र, त्याची संख्या कमी होती.
६ वेळा पडताळणी
सीबीआयकडे याबाबत १० मे रोजी प्रथम तक्रार आली होती. त्यानंतर सीबीआयने ११ मे, १५ मे, २५ मे, २६ मे, ३० मे आणि ६ जून अशी ६ वेळा पडताळणी केली होती. त्यानंतर ९ जून रोजी प्रत्यक्ष लाच देताना सापळा रचून रामोड याला अटक केली.