"मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षाचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:41 AM2022-06-15T10:41:47+5:302022-06-15T11:45:14+5:30

"वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात

"I think it is better to cultivate a tree than to worship a tree.", Says rupali chakankar | "मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षाचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते"

"मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षाचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते"

googlenewsNext

मुंबई/पुणे - राज्यात मंगळवारी वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिला भगिनींनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन वटसावित्रीची पूजा केली. मात्र, या सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं विधान दिवसभर चर्चेत ठरलं. त्यासंदर्भात आता रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे. माझ्या विधानानंतर मला अनेकांचे फोन आले, अनेकांनी कौतुक केलं. काहींनी आक्षेप घेत टिकाही केल्याचं त्यांनी सांगितलं. 

"वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या. हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटल्या, त्यासंदर्भात त्यांनीच माहिती दिली. तसेच, आपण वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 


लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही,’ असे वक्तव्य मी दोन दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदच्या कार्यक्रमात केले होते. माझ्या या वक्तव्याचे स्वागत आणि अभिनंदन करणारे फोन तसेच मेसेज आले. त्यांचे मी आभार मानते. टिका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण, त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन म्हटलं. यंदाच्या वर्षी आम्ही सहकुटुंब वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. माझ्या पतीने वडाचे रोप लावून पूजा केली आणि सात फे-या पूर्ण करुन जन्मोजन्मी ही वैचारिक साथ कायम रहावी म्हणुन प्रार्थना केली. ऑक्सिजनचा स्रोत असणाऱ्या वडाचे रोपटे लावणे, रोपवाटप आणि वृक्षसंवर्धन हीच आमची ‘वटपौर्णिमा’, असल्याचं त्यांनी सांगितलं. 

वृक्ष संवर्धन करणे अधिक योग्य

माझ्या या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला. अनेक मंडळींनी खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेवटी प्रत्येकावर झालेले संस्कार समोर येतातच, अशा शब्दात त्यांनी टिकाकारांना लक्ष्य केलं. वटपौर्णिमेला वड पुजून सात जन्म तोच पती मिळावा,अशी प्रार्थना करणा-या महिला आहेत, त्यांची भूमिका आणि भावना आहे.तसेच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा विचार पुढे नेणारा आणि विज्ञानवादी विचार करणाराही एक वर्ग आहे. मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षांचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते. काय योग्य काय अयोग्य याचा विचार ज्याचा त्याने करावा आणि तशी कृती करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

समाज काय म्हणेल म्हणून वडाची पूजा

रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात रोखठोक मत व्यक्त केलं. समाजात अनेक अनिष्ठ प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी वटपौर्णिमेवर देखील भाष्य केलं. "आपला समाज महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेऊन त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. वटपौर्णिमेचं उदाहारण घ्या. अनेक महिला वडाला फेरे मारतात. सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात. पण, त्यातीलच काही महिला नवरा त्रास देतो म्हणून तक्रारही करत असतात. शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते", असं चाकणकर म्हणाल्या. 
 

Web Title: "I think it is better to cultivate a tree than to worship a tree.", Says rupali chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.