मी सांगितले होते ना यांना बोलावयाचे नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:57 PM2023-10-20T12:57:06+5:302023-10-20T12:57:33+5:30
मनसेचा घरगुती कार्यक्रम असून कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे, त्यामुळे मीडियानेही बाहेर जावे
पुणे : सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली. बरोबर ११.४५ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभागृहात आले आणि सुरवातीला त्यांना मीडियाच्या लोकांची गर्दी दिसली. त्यावर ते तिथे थांबून कार्यकर्त्यांना म्हणाले की, मी सांगितले होते ना ! यांना बोलवायचे नाही ! मग हे कसे काय आले. यांना बाहेर जायला सांगा.’’ असे राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा फटकारले. जर अगोदरच मीडियाला बोलावू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या, तर त्यांची अंमलबजावणी का झाली नाही ?. असा संताप व्यक्त करत मीडियाच्या लोकांनी तिथून काढता पाय घेतला.
पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी सकाळी १० ते १ या वेळेत केले होते. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मनसेचे कार्यकर्ते हजेरी लावत होते. सर्वांना सभागृहाबाहेर नाव नोंदवून आयकार्ड दिले जात होते. दरवाज्यातून आत आयकार्ड पाहून सोडले जात होते. परंतु, जेव्हा मीडियाची लोकं आत जात होती, त्यांना मात्र तिथून सोडले जात होते. तिथे मीडियावाल्यांना परवानगी नाही, अशी सूचना कोणालाही दिली नव्हती. त्यामुळे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सभागृहात जाऊन बसले होते. तसेच काहीजण शूटिंगसाठी समोरच उभे होते. जेव्हा राज ठाकरे यांनी पावणेबारा वाजता सभागृहात प्रवेश केला तेव्हा त्यांना समोरच मीडियाचे प्रतिनिधी दिसले. त्यांनी लगेच सांगितले की, मी यांना बोलवू नका, असे सांगितले होते तरी देखील हे कसे काय आले ?.’’ त्यानंतर राज ठाकरे व्यासपीठावर जाऊन बसले. तेव्हा मनसेचे पदाधिकारी अनिल शिदोरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. राज ठाकरे यांनी किशोर शिंदे यांना जवळ बोलावून काही तरी संदेश दिला. त्यानंतर ते समोर आले आणि कार्यकर्त्यांना ते बोलले. शिदोरे यांनी देखील मग माईकवरून मीडियाच्या प्रतिनिधींना बाहेर जाण्याची घोषणा केली. ते म्हणाले, हा मनसेचा घरगुती कार्यक्रम आहे. कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे. त्यामुळे मीडियाचे प्रतिनिधी जर कुठे बसले असतील, तर त्यांनी सभागृहा बाहेर जावे. मनसेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, तुमच्या आजुबाजूला जर कोणी प्रतिनिधी दिसले तर त्यांना बाहेर जाण्यास सांगावे. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना आयकार्ड दिलेले आहे, त्यामुळे आयकार्ड नसलेले मीडियाचे प्रतिनिधी ओळखू येतील.’’ यानंतर सभागृहातील मीडियाच्या लोकांनी लगेच तिथून काढता पाय घेतला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जर मीडियाला कार्यक्रमाचा मेसेज दिला नसता, तर कोणालाही कार्यक्रम असल्याचे समजले नसते. मीडियाला आमंत्रण द्यायचे आणि मग परवानगी नाही, असे सांगायचे ही अतिशय संताप आणणारी बाब असल्याची भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.