मी तर म्हणालो होतो ' तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:38 PM2019-12-30T16:38:17+5:302019-12-30T17:01:35+5:30
आढळरावांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल..
जुन्नर : अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या लेण्याद्रीच्या दर्शनासाठी विनाशुल्क प्रवेश देण्यात यावा,अशी स्थानिकांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांनी उपोषणही सुरु केले आहे. शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाहीत , असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ तालुक्यामध्ये व्हायरल झाला आहे.या वक्तव्याचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरातन लेण्या आहे. त्या पाहण्यासाठी आलेल्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून भरमसाठ प्रवेशशुल्क आकारण्यात येते. त्या शुल्क वसुलीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.त्यावेळी आढळराव बोलत होते. ते म्हणाले, लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये पुरातन लेणी असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क वसूल करण्यात येते. या शुल्क वसुलीला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.आमचं सगळ्याचं म्हणजेच ग्रामस्थ, देवस्थान असेल किंवा आमच्या तालुक्यातील सगळी जनता असेल सर्वांच असं म्हणणं आहे की लेणी बघायला कोणी येत नाही. गेल्यावेळी तर मी म्हणालो होतो, तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाही..
लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये पुरातन लेणी असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क आकारण्यात येते. याला स्थानिकांचा विरोध आहे. तसेच पैसे खर्च करुन देवस्थानचं दर्शन घ्यायचं असे चित्र भारतामध्ये दुसरीकडे कुठेही नाहीये, ही बाब मंत्र्यांसहित डायरेक्टर जनरलसहीत सर्वांनी मान्य केली होती, असे स्पष्ट केले आहे. लेण्याद्रीच्या दर्शनासाठी पैसे आकारण्यात येऊ नये, अशी भूमिका आढळराव यांनी मांडली.