मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही - आशुतोष गोवारीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 04:15 IST2019-12-04T04:10:58+5:302019-12-04T04:15:01+5:30
‘पानिपत’ चित्रपटाने कादंबरीतील काही भाग विनापरवानगी घेतला असल्याच्या आरोपाबाबत गोवारीकर म्हणाले, ऐतिहासिक विषयांवर चित्रपट तयार करताना मी इतिहासाचाच आधार घेतो

मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही - आशुतोष गोवारीकर
- राजू इनामदार
पुणे : कादंबरी व चित्रपट हे दोन वेगवेगळे कलाप्रकार आहेत व ते दोन्ही इतिहासाचा आधार घेत तयार होतात, मग मी कांदबरीचा आधार कशासाठी घेऊ? मी इतिहासालाच प्रमाण मानतो. याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असे स्पष्टीकरण ‘पानिपत’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिले.
‘पानिपत’ चित्रपटाने कादंबरीतील काही भाग विनापरवानगी घेतला असल्याच्या आरोपाबाबत गोवारीकर म्हणाले, ऐतिहासिक विषयांवर चित्रपट तयार करताना मी इतिहासाचाच आधार घेतो. त्यामुळे कांदबरी किंवा ललित स्वरूपातील काही वाचण्यापेक्षा संशोधनपूर्वक साकार झालेला एखादा संदर्भ ग्रंथ अभ्यासणे योग्य असेच मला वाटते.
त्यानुसार मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे. पुण्यातीलच इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांच्याकडून थेट पेशवे दप्तरात असलेल्या पानिपतसंबंधीच्या पत्रांचे दाखलेही घेण्यात आले आहेत. कादंबरी व चित्रपट इतिहासाचा आधार घेत तयार होतात, मग मी कांदबरीचा आधार कशासाठी घेऊ. याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही.
पानिपतच का? चालणारा विषय आहे म्हणून की इतिहासप्रेम? या प्रश्नावर गोवारीकर म्हणाले, पानिपत या विषयात फार मोठा संघर्ष दडलेला आहे. तो मला अनेक वर्षांपासून साद घालत होता.
हातातील इतर काही प्रकल्प संपल्यानंतर याला वेळ द्यायचा असे ठरवले. ही फक्त लढाई नाही किंवा फक्त इतिहासही नाही तर त्यापेक्षा जास्त काही आहे. ते पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणाले, दोन वर्षांपासून मी संहिता तयार करत होतो. एकदा संहिता तयार झाली की मी त्यात कधीही फारसा बदल करत नाही. त्यामुळेच या चित्रपटाचे चित्रिकरण मी १२५ दिवसांत पूर्ण करू शकलो. पानिपत मोहिमेतच जवळपास ५०० व्यक्तीरेखा आहेत. चित्रपटात १२५ पेक्षा जास्त पात्रे आहेत.
‘ तंत्रज्ञानामुळे चित्रीकरणाचे काम सोपे झाले ’
गोवारीकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे खरे असले तरी दागिने, शस्त्रास्त्रे, कपडे, त्यात पुन्हा पदानुसार, कामानुसार असलेले प्रकार वेगवेगळे, हे सगळे काळानुरूप तयार करावेच लागते. पेशवाईतील पानिपतचा युद्धकाळ हा मराठा साम्राज्य देशात मोठ्या स्थानी असल्याचा काळ होता. अन्य राज्यांतील, प्रदेशातील खाण्यापिण्याच्या नेसण्याच्या संस्कृतीत तीही संस्कृती मिसळली होती. ते सगळे दाखवायचे म्हणजे त्या-त्या विभागाचा अभ्यास असणारी माणसे मिळाली व पानिपत साकार झाला.