मला आता मेट्रोतच राहावं वाटतंय ! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केली मेट्रोची सफर
By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2025 17:45 IST2025-01-24T17:44:11+5:302025-01-24T17:45:07+5:30
आगाशे यांनी स्वत: मेट्रोचे तिकिट काढले आणि आत बसले. तेव्हा काही प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला.

मला आता मेट्रोतच राहावं वाटतंय ! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केली मेट्रोची सफर
पुणे : ‘‘माझं आताचं फिलिंग काय ते सांगू का ? तर मला आता मेट्रोतच राहावं वाटतंय ! एवढी छान, सुंदर, स्वच्छ मेट्रो साकारली आहे. माझ्या हयातीमध्ये मला मेट्रोने प्रवास करता आला आणि जमिनीखालूनही जाता आलं, खरोखर मला खूप आनंद होत आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते डॉ. माेहन आगाशे यांनी व्यक्त केल्या.
आगाशे यांनी मेट्रोची सफर केली. तेव्हा त्यांनी मेट्रोविषयीची आपली प्रतिक्रिया दिली.
त्यांना मेट्रोचा प्रवास अत्यंत आनंददायी आणि कोंडीमुक्त करता आला. कुठेही वाट पाहावी लागली नाही, तिकिटही लगेच मिळालं आणि मनमुक्त असा प्रवास झाला. मेट्रो अधिकाऱ्यांनी आगाशे यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, त्याविषयी सांगितले. आगाशे यांनी स्वत: मेट्रोचे तिकिट काढले आणि आत बसले. तेव्हा काही प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला.
आगाशे म्हणाले, मला पहिल्यांदाच सार्वजनिक वाहतूक एवढी सुंदर, स्वच्छ पहायला मिळाली. खरोखर मेट्रो एकदम सोयीस्कर आहे. आता मला कळलं की, डेक्कनला, फर्ग्युसन रोडवर गर्दी का होते ? बाहेरून आलेले सर्व लोक डेक्कनला येतात आणि केवळ खाणे, खाणे, खाणे, खाणे ! एवढंच त्यांना नाद असतो.’’अशी गंमतही त्यांनी या वेळी केली. आगाशे यांनी डेक्कन जिमखाना ते पीसीएमसी असा प्रवास केला. घर ते मेट्रोस्थानक मग मेट्रोने प्रवास करून थेट पीसीएमसी स्थानकावर गेले. मेट्रो स्थानकाहून घरी रिक्षाने गेले.
मला आता या वयात मेट्रोचा प्रवास करता आला, खरंतर २५ वर्षांपूर्वी जर ही सुविधा पुण्यात असती तर मी मेट्रोनेच प्रवास केला असता. मेट्रोने फिरलो असतो. जमिनीखालूनही प्रवास करता आला. मेट्रोमध्ये सूर्यप्रकाश देखील येतो आणि प्रवास करताना हवेशीर, सुंदर पुणे पहायला मिळते. -डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते