'मी ही नॉट रिचेबल झालो होतो पण...'; सचिन अहिरांनी खासदार बारणेंना मारली कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:10 PM2022-06-26T23:10:42+5:302022-06-26T23:11:11+5:30
आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात शिवसैनिकांचा मेळावा झाला. 'लोकसभा न्याय मेळाव्यात' अहिर बोलत होते.
शिवसेना आमदार एकामागोमाग एक असे गुवाहाटीकडे कूच करू लागले आहेत. सध्याच्या घडीला शिवसेना खासदार आणि आदित्य ठाकरेंसह काही आमदार महाराष्ट्रात आहेत. असे असले तरी कोण कधी शिंदे गटाला जाऊन मिळेल याचा नेम सांगता येत नाहीय, एवढी धक्कादायक परिस्थिती शिवसेनेत उद्भवली आहे. असे असताना एखादा जरी आमदार नॉट रिचेबल झाला तरी शिवसेनेत कशी धडकी भरतेय यावर आमदार सचिन अहिर यांनी उदाहरण दिले आहे.
आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात शिवसैनिकांचा मेळावा झाला. 'लोकसभा न्याय मेळाव्यात' अहिर बोलत होते. यावेळी बारणे साहेब कुठे जात असाल तर कृपया सांगून जा अशी कोपरखळी मारली. तसेच काही वेळापूर्वी वारीत असल्याने माझा फोन नॉट रिचेबल होता, तेव्हा मला पक्षातून दहा फोन येऊन गेले, असेही अहिर यांनी सांगितले.
बंडखोर आमदारांनी जर पक्ष सोडलेला नाही तर दीपक केसरकर यांना का सांगावं लागलं की, आम्ही दुसरा गट करतोय..? हे आमदार लोकांमध्ये जाणार तर लोक विचारतील ना की साहेब, किती कोटीत सेटलमेंट झाली..? मुंबईत जायचं नसेल, पुण्याला मान द्यायचा असेल तर निश्चितपणे इथेच उतरा, आम्ही शाल श्रीफळ घेऊनच उभे आहोत, असे निमंत्रणही अहिर यांनी बंडखोर आमदारांना दिले.
याचबरोबर तुम्ही संपूर्ण विचार, पक्ष संपवायला निघाला आहात. पण हा पक्ष फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न कराल तेवढी वर भरारी आम्ही घेऊ, असा इशाराही अहिर यांनी दिला.