"मला सदस्य करून घेतले, मनसेचे आभार..." राज ठाकरे आले, थांबले आणि लगेच गेलेही
By राजू इनामदार | Published: August 25, 2022 06:00 PM2022-08-25T18:00:52+5:302022-08-25T18:01:44+5:30
मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेस पुण्यातून सुरुवात
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेस पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी सुरूवात करण्यात आली. क्यू आर कोडचा वापर करून होत असलेल्या या सदस्य नोंदणीत पक्षाचे पहिले प्राथमिक सदस्य करून घेतल्याबद्दल राज यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
बुघवारी सायंकाळीच राज मुक्कामाला पुण्यात आले होते. सकाळी बरोबर ११ वाजता ते पक्षाच्या दांडेकर पूल रस्त्यावरील कार्यालयात उपस्थित झाले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, नेते अनिल शिंदोरे, संपक नेते बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे तसेच गणेश सातपुते, योगेश खैरे, संतोष पाटील तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी प्रत्येक राजकीय पक्षाला प्राथमिक सदस्य नोंदणी करून घ्यावी लागते. त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचे राज यांनी सांगितले. नोंदणीसाठी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली वापरण्यात येत आहे. राज यांनीही त्याप्रमाणे मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून नंतर मोबाईलवरच येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करत नोंदणी करून घेतली.
नोंदणी झाल्यानंतर राज लगेचच भांडारकर रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी गेले व तिथूनच मुंबईला रवाना झाले. कोणतीही बैठक किंवा पत्रकार परिषद वगैरे घेणार नसल्याचे त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवले होते. मोबाद्द्वारे सदस्य नोंदणी केल्यानंतर संबधिताच्या मोबाईवर राज यांचे भाषण, तसेच पक्षाची धोरणे, वेळोवेळी केलेली आंदोलना याच्या माहितीच्या किल्प्स येतील असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात आता याच पद्धतीने नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.