मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 03:02 PM2024-01-06T15:02:52+5:302024-01-06T15:18:42+5:30
अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
पुणे : मला पदाचा मोह नव्हता, मी पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका घेतली. खोटे बोलून भाजप-शिवसेनेची युती तोडण्यात आली होती. सत्ता आल्यानंतर टुणकन उडी मारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेवर लाथ मारली, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते शनिवारी पुणे दौऱ्यावर होते.
अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती. घरात बसून उंटावरून शेळ्या आम्ही राखत नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शेतकरी संकटात असताना आमच्या सरकारने मदत केली. हे सरकार लोकांसाठी आहे. सामान्य जनेतेचे हे सरकार आहे. विरोधकांना स्वतःवर विश्वास नाही. ते भरकटले आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
१९९५ ला बाळासाहेबांना वाटलं असतं तर त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं. तर दुसरीकडे सत्ता येताच लगेच ते मुख्यमंत्री झाले असं म्हणत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंनी निशाना साधला. सध्या शिवसेनेत अनेक जण येत आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सगळ्या शिवसैनिकांचे आभार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजपासून शिवसंकल्प अभियान सुरू केले.