मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
By नम्रता फडणीस | Updated: March 3, 2025 19:06 IST2025-03-03T19:05:05+5:302025-03-03T19:06:39+5:30
देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असून त्याने चिथावणी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती

मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
पुणे : मी तक्रार मला मारहाण करणा-या ३ ते ४ अनोळखी लोकांविरुद्ध दिली होती. मला मारहाण होण्यापूर्वी तसेच मारहाण होतेवेळी व मारहाण झाल्यानंतर इतर कोणत्याही लोकांनी कोणतीही चिथावणी दिली नाही. या लोकांव्यतिरिक्त इतर कोणीही घटनास्थळी हजर नव्हते. आरोपींनी मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र फिर्यादी देवेंद्र जोग यांनी सोमवारी न्यायालयात दाखल केले.
या मारहाण प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या गजा मारणे याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली असून, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर या तीन जणांना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दि. 19 फेब्रुवारीला गजा मारणे 35 जणांसोबत चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकीवर होते, तर गजा मारणे हा फॉर्च्युनरमध्ये होता. चित्रपट पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणाबरोबर गजा मारणेसोबत असलेल्या सहकाऱ्यांचे भांडण झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी चिथावणी देण्यासाठी गजा मारणेचा पुढाकार होता अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.
दरम्यान, जोग यांना मारहाणप्रकरणात अटक केलेल्या गजा मारणे आणि त्याच्या तीन साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गजा मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला आहे. यावेळी फिर्यादी जोग स्वतः न्यायालयात उपस्थित होते. मारहाण प्रकरणी इतर कोणत्याही व्यक्तींनी चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.
यावेळी आरोपीचे वकील अँड विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की प्रथमपासूनच हा खोटा गुन्हा आहे. गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रयत्नात मारणे वर पूर्वीचे गुन्हे आहेत. म्हणून त्याला गुंतवण्यात आले. घटनास्थळावर मारणे हजर नव्हता. त्याच्यापासून 500 मीटर वर ही घटना घडली. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच येत नाही आणि फिर्यादी स्वतः त्याच्या वकिला मार्फत हजर होऊन या युक्तिवादला पुष्टी दिली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालायीन कोठडी तर तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.