फिल्म इंडस्ट्रीतल्या गटबाजीचा मला फटका ; अभिनेत्रीने घेतली "या" गटांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 06:55 PM2019-11-20T18:55:41+5:302019-11-20T23:40:14+5:30
मी कुठल्या ग्रुपचा भाग नसूनही फिल्म इंडस्ट्रीमधल्या राजकारणाचा मला फटका बसला आहे आणि अजूनही बसत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
पुणे : सगळ्या क्षेत्राप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीतही राजकारण आहे. आपल्याकडे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असून, आपले विचार मांडू दिले जात नाहीत, असे मत अभिनेत्री श्रृती मराठे यांनी व्यक्त केले. मी कुठल्या ग्रुपचा भाग नसूनही फिल्म इंडस्ट्रीमधल्या राजकारणाचा मला फटका बसला आहे आणि अजूनही बसत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कटटा’ अंतर्गत आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात श्रृती मराठे यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.
त्या म्हणाल्या की, 'मी कुठल्याही ग्रुपचा पार्ट नाही मराठी चित्रपट सृष्टीत महेश मांजरेकर,रवी जाधव,अमेय खोपकर यांचे ग्रुप आहेत.यांच्या कुठल्याच ग्रुपमध्ये नाही मी नाही..मला याचा अगोदर त्रास व्हायचा. पण आता ते नाही त्याचं बरं वाटतंय असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
वेब सिरीजविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, वेब सिरीजमध्ये अभिनयाला वाव आहे. वेब सिरीज या नव्या माध्यमात प्रत्येकाला काम करावेसे वाटते. जिथे दिसण्यापेक्षा तुमच्या अभिनयाकडे सगळ्यांचे लक्ष असते. कलाकारांना वेब सिरीजमुळे एक चांगला प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. वेब सिरीजमध्ये तुमच्या अभिनयाला वाव असतो.
त्या पुढे म्हणाल्या, हल्ली नाटक ज्या पद्धतीने पोचायला हवे त्या पद्धतीने पोचत नाही. संहिता आणि निर्मिती चांगली असूनही, प्रेक्षक त्याकडे वळत नाहीत हे वास्तव आहे. काही वेळेला कमी प्रयोग करून त्या नाटकांचे प्रयोग थांबवावे लागतात. संगीत नाटकांबद्दल मला अद्याप कोणी विचारले नाही. मला मालिका, नाटक, वेब सिरीज आणि चित्रतट या तिन्ही माध्यमात काम करायला आवडते. सध्या कलाकारांना सोशल मीडियामध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण, मी जास्त ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही, असेही त्या म्हणाल्या.