येत्या लोकसभा निवडणुकीत मावळसाठी महायुतीचा उमेदवार मीच असणार- श्रीरंग बारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:16 PM2023-12-01T13:16:55+5:302023-12-01T13:18:01+5:30
मी जनतेत राहून काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. मागील २७ वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे...
लोणावळा (पुणे) : लोकसभेला महायुतीचा मावळचा उमेदवार मीच असणार आणि विजयीही मीच होणार. हा माझा फाजील आत्मविश्वास नाही तर ठाम विश्वास आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
खा. बारणे म्हणाले, मी जनतेत राहून काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. मागील २७ वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे. या काळात डोक्यात किंवा अंगात कोणतीही हवा शिरू दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काय काम केले, हे मी जनतेला सांगेन. कोणीतरी राजकीय द्वेषातून व सुडापोटी मी काय काम केले, असे विचारत असेल तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पक्षाने सांगितले तर मी लोकसभा लढवायला तयार आहे, असे म्हटले होते. त्याबाबत खासदार बारणे म्हणाले, भाजपचे नेते अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जे खासदार मुख्यमंत्र्यांसोबत आहेत, त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. बाळा भेगडे यांनी वरिष्ठांकडून माहिती घ्यावी. भाजपच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे, असे मला वाटत नाही.
राष्ट्रवादीने मावळच्या जागेवर दावा केला आहे. यावर खा. बारणे म्हणाले, राष्ट्रवादीला त्यांची ताकद वाढली आहे, असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल मागणी करावी. मागील काळात मी राष्ट्रवादीचा दोन लाख मतांनी पराभव केला आहे. आजमितीला माझ्यासमोर कोणीही इच्छुक नाही. मग येणाऱ्या निवडणुकीत मीच उमेदवार आहे, असे म्हटले तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे?
राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप
खा. बारणे म्हणाले की, मी नऊ वर्षे खासदार आहे. या काळात माझा कोठेही ठेका नाही. माझे कार्यकर्ते कोणाकडे जात नाहीत. मी कोणावर टीकाटिपण्णी करत नाही. सरळमार्गी आहे, तरी केवळ राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल.
मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का?
खा. बारणे म्हणाले की, निवडणुका आल्या म्हणून वातावरण निर्माण करण्यासाठी काहीजण आरोप करत आहेत. मी मोदी लाटेवर निवडून आलो, असे सांगत आहेत. मग त्यांचा किंवा अजित पवार यांचा नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का? तुम्ही कोणत्या विचारांनी महायुतीत आलात, याचेही उत्तर द्या.