कसब्यातील प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेणार; धंगेकरांनी घेतली बापटांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:51 PM2023-03-03T16:51:42+5:302023-03-03T16:51:56+5:30
राजकीय विरोध हा केवळ निवडणुकीपुरता असावा इतर वेळी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करावे, असाच माझा प्रयत्न
पुणे: कसबा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी धंगेकर यांनी बापट यांची आज भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी कसब्यातील महत्त्वाच्या प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेणार असल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी आणि खासदार गिरीश बापट यांनी तब्बल २५ वर्षे कसबा विधानसभेत भाजपची सत्ता टिकवून ठेवली. त्यामध्ये बापट यांच्याबद्दल लोकप्रियताही प्रचंड वाढली होती. पोटनिवडणुकीच्या अगोदर ते आजारी असतानाही भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये बापट यांचे नाव गणले जाते. हेमंत रासनेंच्या प्रचारात ते स्वतःहून उपस्थित राहिले होते. प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना राजकारणापासून आता दूर राहावे लागत आहे. पण सर्वपक्षीय नेते अजूनही त्यांचे मार्दर्शन घेण्यासाठी येत असतात. अशातच रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर त्यांची भेट घेतली.
धंगेकर म्हणाले, पुण्यनगरीचे खासदार आदरणीय गिरीशभाऊ बापट यांची आज भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. कसबा मतदार संघाचे आजवर आदरणीय गिरीश भाऊंनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे आदरणीय भाऊ सार्वजनिक राजकारणात जास्त सक्रिय नसले तरी कसब्यातील महत्त्वाच्या प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेईल. राजकीय विरोध हा केवळ निवडणुकीपुरता असावा इतर वेळी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करावे, असा माझा अगोदर पासूनच प्रयत्न असल्याने निश्चितच कसबा पेठेच्या राजकारणात या पुढील काळात सर्वसमावेशक राजकारणाची परंपरा जपली जाईल.
कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर अनेकांनी नोटाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे. १ हजार ३९७ मतदारांनी नोटा मतदान केले आहे. रासनेंना त्यांच्या प्रभागातून आघाडी मिळण्याच्या विश्वास होता. तो या निवडणुकीत खरा ठरला. मात्र हि आघाडी धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. तर इतर प्रभागात धंगेकर सातत्याने आघाडीवर राहिल्याने अखेर धंगेकरांचा विजय झाला.