'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:53 PM2022-11-09T12:53:12+5:302022-11-09T12:53:21+5:30

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे

I will continue to do whatever I can for the farmers Cricketer Ajinkya Rahane will take the plow in hand | 'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

Next

पुणे : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. अजिंक्य रहाणे आणि सहकारी काही कृषी तंत्रज्ञान स्टार्ट अप्समध्ये बियाणे गुंतवणूक करतील. यासाठी ते १ कोटी रुपयांच्या निधीपासून सुरुवात करतील. पुढील काही महिन्यांत आणि वर्षांमध्ये येण्यासाठी आणि फंडाचा आकार वाढविण्यासाठी आणि प्रभाव वाढविण्यासाठी त्यातून इतर गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला पाठिंबा आणि बळकट करण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर या क्षेत्रातील काम करीत आहे. त्या निमित्ताने कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींसाठी उपक्रमाचे उद्घाटन अजिंक्य रहाणे याच्या हस्ते झाले. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, क्रीडा पत्रकार विक्रम साठ्ये यांनी रहाणे यांच्याशी संवाद साधला.

सन २०१४-१५ मध्ये श्रीलंकेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कळले. तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार होता. त्यानंतर, एमसीसीआयएच्या संपर्कात आल्यावर काहीतरी करण्याच्या विचाराला रचनात्मक रूप मिळाले आहे. आपले शेतकरी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे खरे हीरो आहेत. मला गुंतवणुकीतून काहीही अपेक्षा नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना आहे. नवउद्यमींची काम करण्याची किती तळमळ आहे, त्याचा किती प्रभाव आहे हे महत्त्वाचे आहे, अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.

अडचणीच्या काळात स्वतःवर आणि प्रत्येक सहकाऱ्यावर विश्वास ठेवावा लागतो. ॲडलेडचा सामना हरल्यावर प्रत्येकावर विश्वास ठेवून कर्णधार म्हणून कामगिरी करून घ्यावी लागली. निकालाचा विचार न करता, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. यश-अपयश म्हणजे प्रसिद्धी, सामनावीर होणे, धावा करणे एवढेच नाही. शतक केले, शून्यावर बाद झालो, यापेक्षा मला जे आवडते ते करत राहणे, उणिवा दूर करत राहणे, कौशल्य वाढवत राहणे आवश्यक आहे. आपले अपयश आपण मान्य केले पाहिजे, असे रहाणे यांनी सांगितले.

काेरोना काळात वेगवेगळ्या पातळीवर मदतीचे काम करत होतो. त्यावेळी अजिंक्यने मदतीचा हात दिला होता. एमसीसीआयएतर्फे काही नवउद्यमींची निवड केली जाईल. त्यातून काही नवउद्यमींना अजिंक्यकडून भांडवल उपलब्ध करून दिले जाईल, असे गिरबने यांनी सांगितले.

अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी

शेतकरी कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे माझ्याकडून शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य आहे, ते करीत राहीन. मी शेतकरी कुटुंबातला आहे. क्रिकेट आणि शेतीमध्ये एक साम्य आहे. नुकसान झाले की, शून्यातून सुरुवात करावी लागते, तसेच क्रिकेटमध्येही आहे. अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी लागते. - अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू.

Web Title: I will continue to do whatever I can for the farmers Cricketer Ajinkya Rahane will take the plow in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.