दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:38 IST2025-01-03T10:37:32+5:302025-01-03T10:38:19+5:30

संपर्क कार्यालयाचे उद्घाटन: संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची मोहोळ यांनी स्वीकारली जबाबदारी

I will fulfill expectations regarding the literary conference in Delhi: Muralidhar Mohol | दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : मुरलीधर मोहोळ

दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी अशी पुण्याची ओळख आहे. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून, मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणिवेने, आत्मीयता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करीन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन गुरुवारी (दि. २) मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतीश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्यसेवकांचा सत्कार याप्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते.

साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ म्हणाले की, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून, प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे, ही संकल्पना जपली जात आहे. 

Web Title: I will fulfill expectations regarding the literary conference in Delhi: Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.